महाराष्ट्रातील जनता मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना कदापि सहन करणार नाही – अतुल लोंढे

मुंबई : १६ डिसेंबर – राज्यात सध्या हिंदू व हिंदूत्वाच्या मुद्द्यावर राजकारण पेटताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्व यांच्यातील स्पष्टीकरण दिल्यानंतर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. या कारणावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील जनता मोदी यांची तुलना कदापि छत्रपती शिवाजी महाराजांशी सहन करणार नाही, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी आहेत. महाराजांचे राज्य जाती-पाती, धर्माच्या पलिकडले होते. स्त्री सन्मान करणारे रयतेचे राजे शिवाजी महाराज होते. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे आहेत. ८० करोड पेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेखाली नेणारे मोदी आहेत, म्हणून महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मोदींशी कदापी सहन करणार नाहीत, असे लोंढे म्हणाले आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना टीकेचे धनी बनवले असताना पाटील यांच्या समर्थनार्थ आता प्रवीण दरेकर पुढे आलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य शब्दशः घेऊ नका, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन जाणारे हिंदुत्व असा त्यांना सांगायचं होतं, असं प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

Leave a Reply