प्रवीण दरेकरांनी केली ६० दिवस मजुरी, मोबदला मिळाला २५ हजार ७५० – सहकार विभागाने पाठवलेल्या नोटिसीमधून उघड

मुंबई : १६ डिसेंबर – राजकारणात काहीही होऊ शकते. हे आपण सदासर्वकाळ अनुभवत असतो. आता त्यातच चक्क विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तब्बल ६० दिवस मुजरी केल्याचे उघड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या मोबदल्यात दरेकर यांना २५ हजार ७५० रुपयांचा मेहनताना मिळाला आहे. त्यातही कडी म्हणजे हा सारा प्रकार सहकार विभागाने दरेकर यांना पाठवलेल्या नोटीसमधून समोर आला आहे. आश्चर्य आहे की नाही, आता तुम्हीच ठरवा.
सध्या मुंबई बँकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर यांनी अर्ज भरला आहे. त्यात त्यांनी मजूर प्रतिनिधी म्हणून हा अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे यापूर्वीही ते मजूर संस्थेच प्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. ते बँकेचे अध्यक्षही होते. आता या निवडणुकीत मात्र, कुठे माशी शिंकली माहित नाही. सहकार विभागाचे मुंबई सहनिबंधक केदारी जाधव यांनी नोटीस पाठवली.
सहकार विभागाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार १२ डिसेंबर रोजी तपासणी केली. त्यांना प्रतिज्ञा मजूर संस्थेची कामवाटप वही सापडली. त्यात सभासदांचा हजेरीपट नोंदवलेला होता. तिथे दरेकरांचेही नाव आढळले. त्यांनी मजुरीपोटी रोख रक्कम घेतल्याची नोंद आहे. त्यावर सुपरवायझरच्या सह्या आहेत. मात्र, दरेकर यांना मजुरीचे काम करताना पाहिले नाही, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
सहभाग विभागाने बजावलेल्या नोटीसनुसार दरेकर यांनी एप्रिल २०१७ मध्ये ३० दिवस मुजरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन ४५० रुपयांप्रमाणे एकूण १३५०० रुपयांचा मेहनताना मिळाला. नोव्हेंबर २०१७ मध्ये दरेकर यांनी २० दिवस मजुरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन ४५० रुपयांप्रमाणे एकूण ९००० हजार रुपयांचा मोबदला मिळला.दरेकर यांनी डिसेंबर २०१७ मध्ये १० दिवस मजुरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन प्रतिदिन ३२५ रुपयांप्रमाणे एकूण ३२५० रुपयांचा मेहनताना मिळाला.
निवडणुकीवेळी प्रवीण दरेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमदार म्हणूनही त्यांना दरमहा अडीच कोटी मिळतात. त्यामुळे हे पाहता आपण मजूर आहात असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही २१ डिसेंबरपर्यंत सहनिबंधक कार्यालयात बाजू मांडा, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
प्रवीण दरेकर स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमदार आहेत. शिवाय आपण सारेच ते कशा-कशा आलिशान गाड्यांमधून फिरतात हे पाहतोच. त्यामुळे कुणाच्या मनात प्रश्न निर्माण होणारच की, प्रवीण दरेकरांना अशी मजुरी करण्याची वेळ आलीच का? दरेकर यांनी मात्र, आपल्याला अशी नोटीस मिळाली नाही. कदाचित ती बँकेत आली असेल, तर योग्य ठिकाणी योग्य ते उत्तर देऊ, असे म्हटले आहे. आता दरेकर काय उत्तर देणार, याचीच उत्सुकता आहे.

Leave a Reply