नागपूर महापालिकेत ३ महिन्यात ६७ लाखांचा स्टेशनरी घोटाळा, ६ जणांना नोटीस

नागपूर : १६ डिसेंबर – नागपूर महापालिकेच्या विविध विभागांत तसेच झोनमध्ये स्टेशनरी व प्रिंटिंगला पुरवठा केला जातो. यात पुरवठ्यात गेल्या तीन महिन्यांत ६७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वित्त व लेखा अधिकाऱ्यासह सहा जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे अँड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरूकृपा स्टेशनरी, एस. के. एन्टरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आरोग्य विभागाला कोविड कालावधीत साहित्याचा पुरवठा न करता बील उचलण्यात आल्याचा प्रकार आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या निदर्शनास आला.
डॉ. चिलकर यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे तक्रार केली. जोशी यांनी अधिक चौकशी केली असता २० डिसेंबर २०२० ते २१ मार्च २०२१ या कालावधीत विविध विभागांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता ६७ लाखांची बिले उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकार्यात प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा, वित्त विभागातील अफाक अहमद, राजेश मेश्राम, एस. वाय. नागदेव व सामान्य प्रशासन विभागातील मोहन पडवंशी आदींचा समावेश आहे.
या प्रकरणी दोषी फर्मविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहा जणांना नोटीस बजावली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मनपा आयुक्तांनी सांगितलं. तसेच गेल्या तीन वर्षांत तीन लाखांपर्यंत मंजूर केलेल्या सर्व फाईल्स तपासण्यात येणार आहेत. यातून कोट्यवधीचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. कारण मनोहर साकोरे यांनी आपल्या व कुटुंबीयांच्या नावे सहा फर्म तयार केल्या आहेत. या स्टेशनरीची कामे त्यांनाच मिळतात.

Leave a Reply