अमरावतीत शेतात काम करणाऱ्या मजुरांवर बिबट्याचा हल्ला, ३ मजूर व एक वनकर्मचारी जखमी

अमरावती : १६ डिसेंबर – सकाळी ११ वाजताच्या सुमारास संगमेश्वर परिसरातील जयस्वाल यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांवर अचानक बिबट्याने हल्ला चढविला. यामध्ये शेतात काम करणारे ३ मजूर व एक वनकर्मचारी जखमी झाले आहे.अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली असून वन विभागाने तातडीने कारवाई करत रिंगरोड परिसरातून अखेर त्या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
संगमेश्वर परिसरातील विवेक रमाकांत जयस्वाल यांच्या शेतात सकाळी २0 ते २२ मजूर कापूस वेचणीचे काम करत असतांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक बिबट्याने मजुरांवर हल्ला चढविला.यामध्ये शेतमालक विवेक जयस्वाल,सुमन नागवंशी, चंद्रकांत मरसकोल्हे हे गंभीर जखमी झाले. बिबट्याचा थरार पाहून मजुरांनी घटना स्थळावरून जीव मुठीत घेऊन पळ काढला.जयस्वाल यांनी लगेच पोलीस आणि वनविभागाला घटनास्थळी पाचारण केले. यावेळी वडाळी वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक कैलास भुबर यांच्या नेतृत्वात वन विभागाचे टीम घटनास्थळी दाखल झाली.यावेळी बिथरलेल्या बिबट्याने वन विभागाचे कर्मचारी चंद्रकांत मानकर यांच्यावर देखील हल्ला चढविला अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर धुमाकूळ घालणारा तो बिबट वन विभागाच्या चमूने जेरबंद केला. घटनास्थळी बिबट्याची एकच दहशत निर्माण झाली होती. बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला. यावेळी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply