चंद्रपूर येथे टेराकोट्टा पॉटरी क्लस्ट व संशोधन केंद्राला मिळाली तात्विक मान्यता – बाळू धानोरकर यांनी दिली माहिती

चंद्रपूर : १५ डिसेंबर – भद्रावती येथील ग्रामोदय संघाच्या टेराकोट्टा पॉटरी क्लस्ट व संशोधन केंद्राला तात्विक मान्यता मिळाल्याची माहिती खा. बाळू धानोरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योगच्या स्फूर्ती योजनेअंतर्गत टेराकोट्टा पॉटरी क्लस्टरच्या १.८१ कोटीच्या प्रकल्प मंजुर असून, निधी अप्राप्त असल्याने हा मंजूर प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाचा निधी त्वरित मिळावा तसेच प्रशिक्षण व संशोधन उत्कृष्टता केंद्राला ग्रामोद्योग संघात त्वरित मान्यता द्यावी यासाठी खा. धानोरकर यांनी मंगळवारी दिल्ली येथे सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ग्रामोदय संघ भद्रावतीचे विजय श्रीवास्तव व जितेंद्रकुमार चौधरी यांची उपस्थिती होती.
सद्यस्थितीत ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग यांचे सहाय्याने प्रादेशिक कुंभारकाम प्रशिक्षण केंद्रात मातीकाम उद्योगाच्या विविध अभ्यासक्रमाचे नियमित प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहेत. उच्च तापमानाची भांडी (सिरॅमिक) मध्ये विविध उत्पादने, फ्लाय अॅशची उत्पादने जसे विटा, पेव्हर ब्लॉक, दारे- खिडक्यांच्या फ्रेम इत्यादी उद्योग सुरु आहेत. भद्रावती शहरात ग्रामोदय संघात हा प्रलंबित प्रकल्प आल्यास येथील बेरोजगारांचा हाताला काम मिळणार आहे. या भागातील युवकांना काम मिळण्यासाठी खा. धानोरकर नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात देखील हा प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असून, त्यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. यावर उद्योगमंत्र्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, सध्या तात्विक मान्यता प्रदान केली आहे. आता दोन्ही प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply