केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची पत्रकारांवर भडकले केली शिवीगाळ

लखनऊ : १५ डिसेंबर – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असतानाच आज एका कार्यक्रमावेळी मिश्रा यांना त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्याबाबत प्रश्न विचारला असता मिश्रा पत्रकारांवर भडकले. यावेळी त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी पत्रकारांना शिवी दिली. या प्रकारामुळे अजय मिश्रा हे चांगलेच गोत्यात आले आहेत.
लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा प्रमुख आरोपींपैकी एक आहे. त्याच्यावर कोर्टाच्या आदेशाने कठोर कलमे लावण्यात आली आहेत. त्यातच लखीमपूरची घटना हा पूर्वनियोजित कट होता, असा अहवाल विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने दिल्याने आशिष मिश्रा याच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. याबाबत आज प्रश्न विचारण्यात आला असता अजय मिश्रा पत्रकारांवर भडकले.
लखीमपूरमधील ओयल येथे मदर चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी अजय मिश्रा आले होते. यावेळी लखीमपूर खीरी प्रकरणी एसआयटीच्या अहवालावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना मिश्रा यांचा तोल सुटला. ‘हा प्रश्न त्या एसआयटीला जाऊन विचारा. तुला वेड लागलंय का. तुम्ही सा… मीडियावाल्यांनी एका निर्दोष व्यक्तीला अडकवलं आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. किती वाईट वागताय तुम्ही. तुम्हाला काय माहीत आहे’, असे म्हणत अजय मिश्रा या पत्रकाराच्या अंगावर धावून गेले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात अजय मिश्रा यांनी पत्रकारावर हात उचलला असता इतरांनी त्यांना रोखल्याचे दिसत आहे.
दरम्यान, लखीमपूर खीरी प्रकरणात एसआयटीचा अहवाल आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अजय मिश्रा यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. इतर पक्षांनीही मिश्रा यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत असतानाच पत्रकारांशी केलेल्या असभ्य वर्तनाने मिश्रा हे अधिक गोत्यात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply