हा खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव – नाना पटोले

नागपूर : १४ डिसेंबर – नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. या विधानपरिषद निवडणुकीसाठी संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं होतं. महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मात्र भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता पण भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. यांच्याकडे ९० मते जास्त असताना सुद्धा सर्व उमेदवार घेऊन पळावे लागले. त्यांचा घोडेबाजार करावा लागला. हाच खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. आजच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो पण भाजपाने जे कृत्य केले त्यातून त्यांचा नैतिक पराभव झाला. लोकांमध्ये निवडूण येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यामध्ये लोकांनी भाजपाचा पराभव केला,” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
आमचं कुठेही नुकसान नाही. भाजपाचा एक माणूस आमच्याडे आला आहे त्यामुळे पक्ष पुन्हा मजबूत झाला आहे. त्यांचाच पराभव झाला आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी बोलताना दिली. “नागपूर महापालिका भ्रष्टाचाराने भरलेली आहे. नागपूर ग्रामीण भागाने भाजपाला त्यांची जागा दाखवली तसेच महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपाचा पराभव नक्की आहे. त्यासाठी काँग्रेस तयारीला लागलेले आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply