संपादकीय संवाद – प्रेक्षकांनी रिमोट हाती घेण्यापूर्वीच वृत्तवाहिन्यांनी शहाणे व्हावे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज देशातील इलेकट्रोनिक माध्यमांना आडव्या हाताने घेतले आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी माध्यमे नको ते विषय दिवस चे दिवस चालवतात आणि जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, अशी टीका केली आहे.
देशातील ५ लाख उद्योजक देश सोडून गेले हे सांगतांना त्यांनी या ५ लाख उद्योजकांच्या देश सोडून जाण्यामुळे किती जणांच्या नोकऱ्या गेल्या याचा विचार माध्यमे करीत नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. आर्यन खान क्रूझवर पकडला गेला ही बातमी आम्ही २८ दिवस पहिली, मात्र अश्या जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आम्ही काहीही बोलत नाहीत, हे राज ठाकरे यांचे दुःख आहे.
राज ठाकरे यांची व्यथा निश्चितच विचारात घ्यावी लागणारी आहे. आमच्या देशात २४ तास बातम्या देणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुरु झाल्यापासून कोणत्या बातम्या दाखवाव्या आणि कोणत्या नाही याबाबत काही धरबंधच राहिलेला नाही. एकच बातमी आम्ही दिवसभर प्रेक्षकांच्या माथी मारत असतो, आम्हाला २४ तास काहीतरी दाखवायचे असते. त्यामुळे काय दाखवावे आणि काय नाही याचा काही धरबंधच उरला नाही, असे म्हणावे लागते. मग एखादा ट्यूबवेलमध्ये अडकला लहान मुलगा हा विषयदेखील आम्हाला ३ दिवस पुरतो बरेचदा आम्ही ब्रेकिंग न्यूज तयार करण्याच्या नादात सनसनाटी बातम्या तयार करतो, त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जातो. काही वर्षांपूर्वी सासरच्या छळाविरुद्ध एक विवाहिता पोलिसात तक्रार करायला गेली होती, सासरच्या मंडळींच्या दबावात पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते, शेवटी त्या नवविवाहितेने अंगावरील कपडे काढून फक्त अंतर्वस्त्रांवर पोलीस ठाण्यात धावत जाण्याचा निर्णय घेतला, वस्तुतः वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या नवविवाहितेला थांबवायला हवे होते, असे अशोभनीय कृत्य वृत्तवाहिनीवर दाखवणे चुकीचेच होते. मात्र ब्रेकिंग न्यूजच्या नादात सर्व चॅनलवाल्यांनी या नवविवाहितेचा हा हल्लाबोल म्हणे लाईव्ह दाखवला आणि प्रेक्षकांनी तो बघितला. हा प्रकार कितपत योग्य होता?
आज वृत्तवाहिन्या जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्या कधीच दाखवत नाहीत, गेल्या दोन वर्षांत सचिन वाझे, परमवीर सिंह, अनिल देशमुख, संजय राठोड, धनंजय मुंडे, कंगना रानौत, सुशांतसिंग राजपूत आणि आदित्य ठाकरे अश्या विषयांवर आम्ही दिवस चे दिवस घालवले मात्र वाढत्या महागाईबद्दल आम्ही बोलत नाही.
हे सर्व प्रकार बघता आता प्रेक्षकांनीच रिमोट हातात घेण्याची वेळ आलेली आहे, आम्ही वृत्तवाहिन्या बघितल्या नाहीत, तर यांना टीआरपी मिळणार नाही परिणामी यांचा महसूल बुडेल तेव्हाच हे लोक शहाणे होतील. प्रेक्षकांनी रिमोट हाती घेण्यापूर्वीच वृत्तवाहिन्यांनी शहाणे व्हावे इतकेच सुचवायचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply