विशेष लेख – अविनाश पाठक

हे असे सहगमन कायम लक्षात राहणार आहे

८ डिसेंबर २०२१ रोजी एका हेलिकॉप्टर अपघातात भारताचे संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी मधुलिका रावत या देखील होत्या. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. परिणामी रावत दाम्पत्यावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उभा देश हळहळला होता.
भारतीय संस्कृतीत पती बरोबरच पत्नीचे निधन होणे हे काही वेळा भाग्याचे समजले जाते. त्यामुळेच की काय पण १८व्या शतकापर्यंत आपल्या देशात सतीची प्रथा होती. पती निधनानंतर विधवा म्हणून जगण्यापेक्षा पती बरोबर सती जाणे हे अनेक ‘महिला स्वीकारायच्या काही वेळा मग त्या महिलेची इच्छा नसतानाही लोक जबरदस्ती करायचे. त्यामुळेच १९व्या शतकात या प्रथेवर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून हे सती जाणे जवळजवळ बंद झाले. तरीही दहा-पाच वर्षातून एखादी सती जाण्याची घटना समोर येतेच.
असे असले तरी पती सोबतच मृत्यू येणे हे त्या पत्नीसाठी आधीच्या परांपरानुसार भाग्याचेच मानावे लागेल. हे बघता बिपीन रावतांबरोबरच आलेला मृत्यू आणि त्यांच्यासोबत केलेला अनंताचा प्रवास हा काहींच्या मते मधुलिका रावत यांच्यासाठी भाग्याचाच म्हणावा लागेल.
या निमित्ताने मधल्या काही वर्षांमध्ये असे पती आणि पत्नीचे एकाचवेळी झालेले काही अपघाती मृत्यू आठवले. आज त्याच संदर्भात मी या लेखात लिहिणार आहे.
अशा सहगमनाबाबतच्या आठवणी जाग्या करायला गेलो तेव्हा सर्वप्रथम आठवले ललित माकन आणि गीतांजली माकन न हे जोडपे ललित माकन हे दिल्लीतील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते विश्वासू सैनिक होते. त्यावेळी ते खासदारही होते. मूळचे हरियाणाचे असलेले माकन दिल्लीत स्थिरावले होते. त्यांच्या सिविद्य पत्नी गीताजंली माकन या तत्कालीन राज्यपाल शंकरडायल शर्मा यांच्या कन्या होत्या, १९८४ मध्ये अमृतसरच्या सवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टार झाले. परिणामी शीख समाज संतापला. त्याचे पर्यवसान दोन शीख जवानांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाले. या घटनेत इंदिराजींचा मृत्यू झाला.
त्यावेळी देशभर शीख समाजाविरोधात संतापाची लाट उसळली. दिल्लीत तर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक शीखांचे शिरकाण केले. शिखांच्या मालमत्ताही लुटल्या. मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली.
या सर्व घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांमध्ये ललित माकन यांचेही नाव घेतले जात होते. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी शिखांशी तडजोड करुन वातावरण कसे निवळेल हा प्रयत्न निश्चित केला. मात्र काही अतिरेकी शिखांनी अशा शीख विरोधकांना टार्गेटच केले होते. त्यांनी अशा लोकांना निवडून गोळीबार करुन ठार मारले. त्यात माकन दाम्पत्यही होते. त्या दिवशी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानाहून कामाला जाण्यासाठी उभयता बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञाताने या दोघांवर गोळीबार केला आणि त्यातच दोघांचाही मृत्यू झाला होता.
अशीच एक घटना नागपूरचे विख्यात मराठी साहित्यिक डॉ. वसंत वाव वऱ्हाडपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वसुमती देशपांडे यांच्याबाबतही घडली. एका कार अपघतात वऱ्हाडपांडे पती-पत्नी आणि त्यांची डॉक्टर असलेली दोन मुले डॉ. संजय आणि डॉ. राजीव असे चौघेही ठार झाले.
ही घटना १९९२ च्या जुलै महिन्यातली आहे. डॉ. वसंत वऱ्हाडपांडे यांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला होता. त्यासाठी त्यांना मुंबईला तपासण्यासाठी आणि पुढील उपचार करण्याकरिता मुंबईला नेण्यात आले होते. सोबत त्यांच्या पत्नी वसुमती आणि थोरला मुलगा डॉ. राजीव हा देखील होता. मुंबईला सर्व तपासण्या झाल्या, आता किरकोळ औषधांनी आजार आटोक्यात आणता येईल हे निश्चित झाले. त्यामुळे मुंबईतील आप्तांच्या भेटी घेऊन वऱ्हाडपांडे पती-पत्नी आणि डॉ. राजीव हे संध्याकाळच्या वेळी विमानाने मुंबईहून नागपूरला परत आले. विमान नागपूरला लँड झाले. त्या तिघांनाही रिसिव्ह करायला धाकटा मुलगा डॉ. संजय कार घेऊन आला होता. सोनेगाव विमानतळावरून हे चौघेही कारने घरी जायला निघाले, रात्रीची वेळ असल्यामुळे वर्धारोडवर भरधाव ट्रक्स धावत होत्या, अशाच एका भरधाव ट्रकने डॉ. संजय चालवत असलेल्या कारला धडक दिली. कार उलटीपालटी झाली आणि या अपघातात डॉ. वसंत, वसुमती आणि डॉ. राजीव जागीच ठार झाले. थोड्याच वेळात डॉ. संजय यांचाही मृत्यू झाला. या चौघांच्याही मृतदेहांवर दुसऱ्या दिवशी एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
अशीच एक घटना ज्येष्ठ पत्रकार संपादक गजानन त्र्यंबक परांडे यांच्याबाबत देखील घडली. ही घटना १९९५ ची. त्यावेळी परांडे सर दै. हितवादचे संपादकीय सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांना चंद्रपूरला सकाळी एका लग्नासाठी जायचे होते. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांच्या आवृत्या चंद्रपूरला नेण्यासाठी नागपूरातून पहाटे ३ च्या सुमारास गाड्या सुटतात. अशाच एका गाडीतून परांडे सरांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा परांडे यांनी चंद्रपूरला जाण्याचे नियोजन केले. पहाटे ३.३०च्या सुमारास ते निघाले. गाडी वर्धारोडवरुन जाम फाट्यापासून न चंद्रपूरच्या दिशेने निघाली. कच्चा रस्ता असल्याने ड्रायव्हर सांभाळूनच गाडी चालवत होता. तरीही काय गडबड झाली ते लक्षात आले नाही. समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली आणि त्यात फ्रंट सीटवर बसलेले परांडे दाम्पत्य जागच्या जागी ठार झाले. परांडे सर हे ख्यातनाम पत्रकार होते. तर अनुराधा परांडे या मराठीच्या शिक्षिका होत्या. त्याचबरोबर मराठीत त्यांनी साहित्यनिर्मितीही केली होती. त्यांच्याही अशा निधनाने उभा महाराष्ट्र हळहळला. त्या वेळचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी परांडेंच्या अपघाती निधनाबद्दल दुःखही व्यक्त केले होते. यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येईल.
असे हे अपघाती किंवा घातपाती मृत्यू ज्यात पती आणि पत्नी यांचे एकाचवेळी निधन झाले आणि एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विपीन रावत आणि मधुलिका रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हे सर्व मृत्यू सहज आठवले म्हणून वाचकांना शेअर करण्यासाठी आज हे लिहिले. हे असे मृत्यू आणि सहगमन कायम लक्षात राहणार आहेत.

अविनाश पाठक

Leave a Reply