पदाचा गैरवापर करून ८ लाखाचा अपहार करणाऱ्या उपडाकपालावर गुन्हा दाखल

भंडारा : १४ डिसेंबर – पदाचा गैरवापर करून टपाल कार्यालयात कार्यरत उपडाकपालाने ८ लाख ५७ हजार ७९८ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहायक अधीक्षकांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी टपाल उपडाकपाल राहूल अनिल मेश्राम याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
राहूल मेश्राम हा २२ जुलै २०१५ ते १४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत लाखांदूर येथील उपटपाल कार्यालयामध्ये उपपोस्टमास्टर व उपडाकपाल या पदावर कार्यरत होता. १९ जानेवारी २०१७ रोजी साकोली उपटपाल कार्यालयात ६ लाख रुपये पाठविल्याची माहिती लाखांदूरच्या दैनंदिन खात्यात दाखविली आहे. मात्र प्रत्यक्षात ६ लाख रुपये ही रक्कम साकोली उपटपाल कार्यालयात पाठविण्यातच आली नाही.
१४ फेब्रुवारी २०१७ रोजी भंडारा पोस्ट ऑफीसचे सहायक अधीक्षक यांनी लाखांदूर उपडाकघराला भेट दिली असता त्यांना २ लाख ५७ हजार ९६८ रुपयांची रक्कम कमी आढळून आली. त्यामुळे संशयाची सुई अधिक गडद होत गेली. याविषयी सखोल चौकशी केली असता उपडाकपाल राहूल मेश्रामने आपल्या पदाचा गैरवापर करून ८ लाख ५७ हजार ९६८ रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले.
याप्रकरणी सहायक अधीक्षक अरविंद गजभिये यांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहूल मेश्राम याच्या विरूध्द कलम ४०९ व ४२९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ताराम करीत आहे.

Leave a Reply