सलूनमध्ये सुरु असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

नागपूर : १३ डिसेंबर – नागपूर शहरातील एका सलूनमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या देह व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत, पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली. तर व्यवसाय चालवत असलेल्या आरोपी रवी चौधरी याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता इसारकर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, बजाजनगर पोलिस ठाणे हद्दीत आरोपी रवी चौधरी हा अजनी चौकातील भवानी चेंम्बरमध्ये ‘रेडीफाईन द प्रोफेशन फॅमिली सलून’ येथे स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून सलूनमध्ये ग्राहकांना पुरवून देहव्यापार करवून घेतो, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर बाबीची शहानिशा करून व सापळा रचून या ठिकाणी धाड कारवाई करण्यात आली. येथून २ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या ठिकाणावरून आरोपी रवी दशानन चौधरी (रा. जुनी अजनी, एस.सी.आय. गोडाऊनच्या बाजूला चुना भट्टी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी हा पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून ग्राहकांना बोलावून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता देह व्यवसाय करण्यास भाग पाडत होता. परिणामी, आरोपीविरुद्ध कलम ३, ४, ५, ७ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई शहराचे पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांच्या निर्देशान्वये पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर, मंगला हरडे, अनिल अंबाडे, रशिद शेख आदींनी केली.

Leave a Reply