म्हाडा भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आता भाजपा आक्रमक, अभाविपचे जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने

मुंबई : १३ डिसेंबर – आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिणामी, म्हाडाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही परीक्षा रद्द केली.
म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणी आता भाजपा आक्रमक झाली आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, अभाविपच्या या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.
म्हाडातील विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू आहे. या भरती परीक्षेसाठी म्हाडाने जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीची निवड केली होती. त्यानुसार रविवारी १२ डिसेंबर, १५ डिसेंबर, १९ डिसेंबर आणि २० डिसेंबरला म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांतील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती. १४ पदांच्या ५६५ जागांसाठी जवळपास पावणेतीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेसाठी दोन-तीन दिवस असताना परीक्षार्थींकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर रविवारी परीक्षा होणार होती. मात्र, ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही परीक्षा रद्द होत असल्याची माहिती ट्वीटरवरून दिली. अचानकपणे रद्द झालेल्या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
यावरून अभाविपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आव्हाड पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत असल्याचा आरोप अभाविपने केला.

Leave a Reply