ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात – संजय राऊत

नवी दिल्ली : १३ डिसेंबर – देशात विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रं आलं पाहिजे. ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी या सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात, असं सांगतानाच सध्या नेतृत्वाचा प्रश्नच नाही. केवळ भाजपला पर्याय देणं हाच एकमेव पर्याय आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. या देशात विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन मतभेद दूर केले पाहिजेत. ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केवळ शरद पवार करू शकतात. नेतृत्वाचा प्रश्नच नाही. केवळ पर्यायाची चर्चा झाली पाहिजे असं पवार सुद्धा म्हणाले आहेत, असं राऊत म्हणाले.
2014मध्ये मोदी पंतप्रधान होतील असं कुणाला वाटलं नव्हतं. राजकारण हे फार चंचल आहे. देशातील जनता शहाणी आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी ते काही करू शकतात. पण आमचं काम सुरू राहील. विरोधकांची एकजूट करणं हा काही देशद्रोह नाही. ही लोकशाहीची पद्धत आहे. आम्ही काही मोदोींच्या विरोधात षडयंत्र रचत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, चर्चा सुरू आहे. एवढ्या घाईत काही सांगू शकत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच कोणताही राजकीय पक्ष निर्णय घेत असतो. आम्हीही गोव्यात 22 जागा लढणार आहोत. युती झाली तर चांगलंच होईल, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply