जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तरुणाची लग्नसमारंभात निर्घृण हत्या

भंडारा : १३ डिसेंबर – गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचे आणि हत्येचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. दोन मित्रांनी लग्नात एकमेकांना पाहिलं आणि जुना वाद पुन्हा एकदा डोळ्यासमोर आला. यामुळेच एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या वादात एकाची चाकूने निर्घुण हत्या करण्यात आली. भंडारा शहरात डॉ. आंबेडकर वॉर्डमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. मैदू पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर उमेश सोनकुसरे असं आरोपीचं नाव आहे. या घटनेत पोलिसांनी उमेशला ताब्यात घेतलं असून त्याच्या फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री डॉ. आंबेडकर नगर परिषदेच्या हॉलमध्ये लग्न समारंभ होता आणि हे दोघेही आपल्या मित्रांसोबत तिथे आले होते. जेव्हा लग्नात या दोघांनी एकमेकांना पाहिलं तेव्हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. याच वादामध्ये उमेश सोनकुसरे याने मैदूवर धारदार शस्त्राने वार केले आणि त्याला जागीच ठार केलं. हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या तर इतरांचाही शोध सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, शहरात हाणामारीचा आणि हत्येच्या अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply