संपादकीय संवाद – नागपुरच्या काँग्रेसमधील भांडणांची श्रेष्ठींनी वेळीच दखल घ्यायला हवी

काल नागपुरात काँग्रेस पक्षातील तथाकथित ज्येष्ठांनी १३५ वर्ष जुना इतिहास असलेल्या काँग्रेसचा अक्षरशः भाजीपाला करून टाकला आहे. पक्षाने दिलेला उमेदवार योग्य नाही, असे म्हणत अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडून आणा असे सांगण्याची नामुष्की या पक्षाच्या नागपूर शाखेवर आली आहे. ज्या नागपुरात एका काळात काँग्रेसचा दरारा होता, त्या नागपुरात काँग्रेसवर अशी गोवऱ्या वेचण्याची वेळ यावी, हे पक्षाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
या घटनेवर भाष्य करण्यापूर्वी संपूर्ण घटनाक्रम तपासणे आवश्यक ठरते. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे, त्यासाठी ही निवडणूक होती, या मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचेच वर्चस्व राहिले होते. ज्यावेळी दोन्ही सभागृहाचा सदस्य नसताना एखादा नेता मंत्री व्हायचा तेव्हा त्याला निवडून आणण्यासाठी हा हुकुमी मतदारसंघ म्हणून मानला जात होता. १९७७ साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात सुधाकरराव नाईक यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली होती, त्यावेळी सुधाकरराव कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, त्यांना ६ महिन्यांच्या आत निवडून येण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ हवा होता. त्यावेळी योगायोगाने नागपूरची जागा रिक्त होती, सुधाकरराव यवतमाळचे मात्र त्यांना नागपुरात आणून या मतदारसंघासातून निवडणूक लढवायला लावली, आणि विजयी सुद्धा केले. असा हा मतदारसंघ आहे. कालपरवापर्यंत इथे काँग्रेसचा उमेदवार हमखास निवडून येत होता, यावेळी भाजपचे पारडे जड होते, तरीही काँग्रेसजवळ राजेंद्र मुळकांसारखे वजनदार उमेदवार होते, मात्र त्यांना डावलून भाजपतून उमेदवार आयात करण्याचा उपदव्याप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला, इतके केल्यावर स्वतः लक्ष घालून उमेदवार निवडून कसा येईल हे बघणे नानांचे काम होते, मात्र नानांनी जबाबदारी झटकत मुंबईला पळ काढला, नागपुरात नितीन राऊत, सुनील केदार, विकास ठाकरे, राजेंद्र मुळक यांच्या मारामारीत प्रचार झालाच नाही. शेवटी उमेदवाराचं आम्हाला साथ देत नाही अशी ओरड करण्यात आली, उमेदवार इच्छुक नाही अशी तक्रार हायकमांडकडे केली. शेवटी हायकमांडने मतदानाला २० तास शिल्लक असताना विद्यमान उमेदवाराची उमेदवारी मागे घेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकारात भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराची तर वाट लागलीच, त्याचबरोबर नागपुरातल्या नेत्यांना लगाम घालून कामाला लावता आले नाही, ही नामुष्की नाना पटोलेंवर ओढवली आहे. नागपुरातले सर्व वजनदार नेते एकत्र न येता आपापसात भांडत राहिले आणि पक्षाची बेइज्जती होऊ दिली, म्हणून या सर्वच दिग्गज नेत्यांचीही श्रेष्ठींसमोरची इज्जत डागाळली आहे.
गेल्या काही वर्षात नागपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अंतर्गत भांडणांनी पार पोखरले आहे, काही वर्षांपूर्वी चतुर्वेदी मुत्तेमवार विरुद्ध इतर सर्व काँग्रेसजन अशी मारामारी होती, नंतर चतुर्वेदी आणि मुत्तेमवार यांचेही फाटले. मधल्या काळात मुत्तेमवार गटाच्या आग्रहामुळे चतुर्वेदींना पक्षातून निष्कासित करण्यापर्यंत वेळ आली होती. एका काळात नागपुरात काँग्रेसचा दरारा होता, जिल्ह्यात बाबासाहेब केदार, शेषराव वानखेडे, नरेंद्र तिडके, असे दिग्गज नेते सक्रिय होते, त्याकाळातही गेव्ह आवारी, अविनाश पांडे, अनिस अहमद अशोक धवड असे तरुण तुर्क होते. मात्र सर्वांना सांभाळून घेत राजकारण केले जात होते, त्यामुळे सर्वत्र काँग्रेस दिसत होती.
मधल्या काळात नेत्यांच्या भांडणांमुळे काँग्रेसची वाट लागली. २०१४ मध्ये संपूर्ण जिल्ह्यातून काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. तिथेही भाजपच्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द झाला, त्यामुळे काँग्रेसचे फावले अन्यथा काँग्रेसचे काही खरे नव्हते. नागपूर महापालिकेतही काँग्रेसची पुरती वाताहत झाली होती.
इतके होऊनही अजून नागपुरातले नेते सुधारले नाहीत, हेच कालच्या प्रकारावरून दिसून आले आहे. श्रेष्ठींनी या प्रकारची वेळीच दखल घ्यायला हवी, अन्यथा नागपुरात काँग्रेसचे काही खरे नाही, हे नक्की.

अविनाश पाठक

Leave a Reply