विशेष सारांश – ल.त्र्यं.जोशी

राष्ट्रवादीला राष्ट्रीयतेचे तर शिवसेनेला संपुआचे डोहाळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १९९९मधील स्थापनेचा संदर्भ आता बदलला आहे. सोनिया गांधींच्या विदेशातील जन्माच्या मुद्यावर शरद पवारांनी कॉंग्रेसचा त्याग करुन या पक्षाची स्थापना केली तेव्हा त्याला अराष्ट्रवादाचा संदर्भ होता. तो संदेश देण्यासाठीच पवारांनी या पक्षाच्या स्थापनेत पूर्णो संगमा व तारिक अन्वर यांना सामील करुन घेतले होते व माध्यमांनी ‘अमर अकबर अ‍ॅन्थोनी’ म्हणून त्याची भलावणही केली होती. पण आता तो संदर्भ बदलला आहे. विशेषत: ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानपदाची आकांक्षा उफाळून आल्यानंतर,त्यासाठी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे, खऱ्या अर्थाने आपला पक्ष सर्व राज्यात आहे हे दाखविण्यासाठी प्रयत्न केले तर ते स्वाभाविकच आहे.त्यानुसार त्या पावले उचलायलाही सुरुवात करु शकतात. त्यामुळेच त्या पक्षाच्या मंगळवारी दिल्लीत झालेल्या कथित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षविस्तार करण्याचा निर्णय झाला असावा. १९९९ चा निर्णय भावनेच्या आधारावर झालेला असेल तर मंगळवारच्या निर्णयाला अखिल भारतीय राजकीय व्यवहाराचा आयाम आहे.
खरे तर १९९९मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर व त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतरही पवारांना आपला पक्षविस्तार करावासाा वाटला नाही. सोनिया गांधींच्या विदेशातील जन्माचा मुद्दाही सोयीस्करपणे बासनात बांधून ठेवून त्यांनी पाच वर्षानीच २००४ मध्ये सोनियाचरणी लोटांगण घालून संपुआ सरकारात कृषिमंत्रिपद मिळविले व ते दहा वर्षेपर्यंत राबविलेही. पण त्या काळातही त्यांनी लक्ष केंद्रित केले होते ते फक्त महाराष्ट्रावरच. कायदेशीर कारणांसाठी त्यांनी गुजरात, बिहार, केरळ, लक्षद्वीप, गोवा आदी राज्यात निवडणुकी लढविल्या असतीलही. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस ओळखली जात आहे, हे कुणाला अमान्य करता येणार नाही.कदाचित ममतांनी आपल्या पक्षाच्या विस्ताराची मोहिम सुरु केली नसती तर आताही पवारांना त्याची गरज वाटली नसती. पण सध्या २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विरोधी पक्षाला आपली सौदाशक्ती वाढवायची आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीने मोठा गाजावाजा करुन आपल्या कथित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत आयोजित केली, असे म्हणायला हरकत नसावी. कारण आतापर्यंत त्या पक्षाच्या ‘ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी केव्हा होत असत, कुठे होत असत,हे कुणाला फारसे कळतही नव्हते. ह्या बैठकी नियमितपणे होत असत, असा दावा तो पक्ष कागदपत्रांच्या आधारे निश्चितच करील पण सत्य काय, हे त्यालाही ठाऊक असणारच.
गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेणे, त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी संपुआचे अस्तित्व नाकारुन तिला श्रध्दांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करणे, यामुळे पवारांची कशी गोची झाली हे मी यापूर्वीच्या एका लेखातून सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक आयोजित करणे हा केवळ योगायोग ठरत नाही. त्यामागेही एक नियोजन आहे व ते म्हणजे पवारांचे राष्ट्रव्यापी नेतृत्व अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न. तशीही ममतांसोबतच्या बैठकीत पवारांनी ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच भूमिका घेतली होती. पण ती फार काळ टिकू देणे त्यांना आवश्यक वाटले नाही. त्यासाठी आपली स्थिती स्पष्ट करण्यासाठी त्यांना काही तरी करणे आवश्यक होते. ते काम दिल्लीतील मंगळवारच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीने साधले गेले आहे. पण त्यातही एक गोम आहेच. शरद पवारांची कात्रजच्या घाटाची शैली ज्यांना माहित आहे, त्यांना ते नक्कीच कळेल.
कुणी मान्य करो वा न करो पण आजमितीला विरोधी राजकारणात ममता बॅनर्जी व राहुल गांधी हे दोन धृव तयार होतच आहेत. ममतांनी राहुलच्या लहरी विदेशयात्रांवर निशाणा साधताच राहुल कसे सतर्क झाले हे मंगळवारीच लोकसभेत पाहायला मिळाले. सभागृहाच्या कामकाजात फारशी रुची न दाखविणाºया राहुल गांधींनी त्या दिवशी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुद्दा लोकसभेत एका स्थगनप्रस्तावाच्या माध्यमातून उचलला व त्यावर भाषणही ठोकले. बहुधा गेल्या सात वर्षात असा प्रयत्न राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला असावा. अन्यथा ते पंतप्रधानांना मिठी मारण्यात आणि नंतर डावा डोळा मिचकावण्यातच धन्यता मानत होते. राहुल गांधींमधील या बदलाचे श्रेय ममतानाच द्यावे लागेल. तसेच जर असेल तर मग त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रव्यापी होण्याच्या आकांक्षेचेही श्रेय कां नाकारायचे? तेही द्यावे लागेल.
अर्थात शरद पवारही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत.म्हणूनच त्यांनी ममतांना दुखविण्याचा फारसा प्रयत्न न करता ममता व राहुल यांच्यात आपली पहिली पसंती राहुल गांधी म्हणजे कॉंग्रेस राहतील, असे सूचित केले. ते करतांना त्यांनी सोनियांना अलगद बाजूला ठेवले. त्यासाठी सोनियांच्या तब्यतीचे कारण त्यांना उपलब्ध आहेच.ममता व राहुल या दोघांनाही बाजूला सारुन आपला पर्याय समोर आणण्याचा जर हा प्रयत्न असेल तर तो शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीला साजेसाच आहे, असे म्हणावे लागेल. राजकारणात नेहमी स्मार्ट खेळी खेळायची असते. त्यात बसणारी ही खेळी असूच शकते.आज ती स्पष्टपणे दिसणार नाही. दिसू नये अशीच योजनाही असावी पण पुढे योग्य वेळी तिचा उलगडा झाला तर ते आश्चर्य ठरणार नाही.
अर्थात राष्ट्रीय पातळीवरील विस्ताराचे काम ना ममतांसाठी, ना शरद पवारांसाठी वाटते तेवढे सोपे नाही. राजकीय पक्ष सहजासहजी उभे राहत नाहीत. सत्तेच्या बळावर तर नाहीच नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारची कार्यशैली महत्प्रयासाने विकसित करावी लागते. कार्यकत्यांचे मोठे बळ उपलब्ध असावे लागते. आज ते ना ममतांजवळ, ना पवारांजवळ उपलब्ध आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममतांनी भाजपाचा पराभव केल्याबद्दल त्यांची पाठ थोपटली जात असेलही पण त्याच निवडणुकीत भाजपाने आपली संख्या ३ वरुन ७७ वर नेली आहे हेही नजरेआड करता येणार नाही. महाराष्ट्रातील मविआ सरकारवरच शरद पवारांच्या उड्या आहेत पण ते सरकार काही जनादेशाच्या बळावर तयार झालेले नाही. त्याच्या मर्यादाही त्यांना योग्य प्रकारे ठाऊक आहेत. सरकार असो वा नसो, पक्ष कसा वाढवायचा असतो हे त्यांनी भाजपापासून शिकायला हवे. पण ते शिकण्यासाठीही ना ममतांजवळ, ना पवारांजवळ वेळ आहे. कारण ते वर्षानुवर्षे सातत्याने करावयाचे काम आहे.
इकडे ममता आणि शरद पवारांना राष्ट्रव्यापी होण्याचे डोहाळे लागले असतानाच शिवसेनेला संपुआचे डोहाळे लागलेले दिसतात. शिवसेनेचे व विशिष्ट अर्थाने शरद पवारांचेही प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारीच घेतलेली राहुल गांधी व प्रियंका वाड्रा यांची भेट हा त्याचा पुरावा. मविआ सरकार स्थापनेच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी सोनियांच्या दरबारात हजेरी लावण्याचा प्रसंग सोडला तर गेल्या दोन वर्षात शिवसेनेने कधी कॉंग्रेसशी जवळिक साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सतत समन्वय साधण्याचे प्रयत्न होत होते. सरकार चालविण्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढाच तिचा कॉंग्रेसशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न सीमित होता. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील संपुआत जाण्याचा विचारही तिच्या मनात आला नाही. उलट शरद पवारांकडे संपुआचे नेतृत्व जावे यासाठी तिने प्रयत्न केले होते व संपुआबाहेरील लोकांनी तिच्या कारभारात चबढब करण्याचे कारण नाही, असा टोलाही कॉंग्रेसकडून स्वीकारला होता. पण राहुल यांच्या भेटीपूर्वीच ‘ मविआ ही मिनीसंपुआच आहे’ असे उदगार काढून आपला पक्ष संपुआत सामील होण्यासाठी किती उत्सुक वा उतावळा आहे हे राऊत यांनी दाखवून दिले आहे.आता फक्त एवढेच पाहायचे आहे की, संपुआ शिवसेनेला तिच्या उरलेल्या हिंदुत्वासह कशी स्वीकारते आणि संपुआतील प्रवेशासाठी शिवसेना त्या हिंदुत्वाशी किती तडजोड करते? सत्तेसाठी तिने हिंदुत्वाशी तडजोड केली वा कॉंग्रेसनेही सत्तेसाठीच शिवसेनेचे जे काही आहे ते हिंदुत्व स्वीकारले हे तर सिध्दच झाले आहे. आता त्यापुढच्या पावलाची प्रतीक्षा करुयात.दरम्यान भाजपा वा एनडीएला विरोधकाती सौदेबाजीवर अवलंबून राहता येणार नाही वा अतिआत्मविश्वासातही जाता येणार नाही. घोडामैदान अद्याप बरेच पुढे आहे.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply