वाघाच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर : १० डिसेंबर – सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र डोंगरगांव मधील मौजा चारगांव (बडगे) जवळील वनक्षेत्रात गुरुवार, ९ डिसेंबर रोजी वनकर्मचाऱ्यांना अंदाजे सात वर्ष वयाचा बिबट मृतावस्थेत आढळून आला. या बाबतची माहिती वनकर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देताच ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (तेंदू व वन्यजीव) आर. एम. वाकडे, मानद वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी विवेक करंबेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. गव्हारे, सिंदेवाही पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. विनोद सुरपाम यांनी घटनास्थळी पोहचून मृत बिबट्याचे निरीक्षण केले.
बिबट्याचे सर्व अवयव शाबुत असल्याची खात्री केली. या बिबट्याचा मृत्यू वाघाच्या झुंजीत झाला असावे, असा प्राथमिक अंदाज पशुचिकित्सकांनी वर्तविला आहे. मध्यवर्ती काष्ट भांडार येथे दुपारी डॉ. एस. एस. गव्हारे, डॉ. विनोद सुरपाम यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. पशुवैद्यकीय अधिकारी यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे अधिकारी व्हि. ए. सालकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply