बांधकामाच्या साईटवर सिमेंटच्या गाडीखाली दबून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नागपूर : १० डिसेंबर – बांधकामाचे काम करणाऱ्या एका महिलेची एक वर्षीय मुलगी तिच्यासोबतच कामावर होती. आई काम करीत असताना ती तिच्या अवतीभवती खेळत होती. यावेळी बांधकाम साईटवर एक टाटा एस गाडी सिमेंटचे पोते घेऊन आले. यावेळी या गाडीच्या चाकाखाली ही चिमुकली चिरडली गेली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान, फिर्यादी रामकुमारी रामकुमार कुंभरे (वय २४, रा. मैत्रीनगर, पांझरा ले-आउट) या कपिलनगर हद्दीतील प्लॉट नंबर १२, उप्पलवाडी) येथे घराच्या बांधकामाचे काम करीत होते. यावेळी त्यांची मुलगी सुमन (वय १) ही बाजूला खेळत होती. दरम्यान, टाटा एस गाडी (क्रमांक एम. एच./ ४९ / ए.टी. / ४९५४) चा आरोपी चालक सुनील उईके हा सिमेंटची बोरी घेऊन आला. त्याने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीची मुलगी सुमन हिला धडक दिली. यात या चिमुकलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध चालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंवि सहकलम १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply