घ्या समजून राजे हो… – काँग्रेसवाल्यांनी छोटू भोयरचा केला सुबोध मोहिते

काल नागपूर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांनी विधानपरिषदेत प्रतिनिधी निवडून देण्यासाठी घेतलेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने अखेरच्या क्षणी आपला उमेदवार बदलवून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिलेली आहे. त्यामुळे आता निवडणूकीचे पूर्ण चित्र बदलून गेले आहे. यात आजतरी बळी गेला आहे तो ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर यांचा. राजकीय अभ्यासकांच्या मतानुसार या संपूर्ण प्रकारात काँग्रेसजणांनी छोटू भोयर यांचा सुबोध मोहिते केला आहे.
या मतदारसंघातून आजवर कधी भाजप तर कधी कांँग्रेस असे उमेदवार निवडून येत होते. 2015 मध्ये भाजपचे गिरीश व्यास इथल्या आमदार होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे मताधिक्य चांगले असल्यामुळे इथे भाजपचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. मात्र काँग्रेसला ही जागा आपल्याकडे घ्यायची होती. त्यासाठी काँग्रेसजण प्रयत्नात होते. नागपुरात सध्या ताकदवान काँग्रेसवाले बरेच गोळा झालेले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जरी गोंदिया जिल्ह्यातले असले तरी त्यांचे सर्व राजकारण नागपुरातूनच चालते. त्याचबरोबर राज्यातले ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील नागपूरचेच आहेत. त्यांचीही काँग्रेस पक्षात वेगळी ताकद आहे. राज्य मंत्रीमंडळातले आणखी एक मंत्री सुनील केदार हे देखील नागपूर जिल्ह्यातलेच आहेत. त्यांनीही स्वतःभोवती वेगळे वलय निर्माण केले आहे. त्यामुळे नागपुरात नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार ही तीन सत्ताकेंद्र सक्रिय आहेत. त्याशिवाय शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचेही स्वतंत्र संस्थान आहे. ही सर्व सत्ताकेंद्रे एकाचवेळी सक्रिय होतात आणि परिणामी नागपुरात गेल्या काही वर्षात काँग्रेसची वाट लागते आहे.
विधानपरिषदेच्या या मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्यावर इथे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र ऐनवेळी नाना पटोले यांनी भाजपमधून उमेदवार आयात करणार असल्याचे घोषित केले. त्यानुसार त्यांनी भाजपचे आणि त्याचबरोबर संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणून त्यांना या मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी दिली.
छोटू भोयर हे जुने संघाचे कार्यकर्ते. त्यांची आई ताराबाई भोयर काही काळ नागपूर महापालिकेत भाजपच्या नगरसेविका होत्या. आईच्याच पावलावर पाऊल ठेऊ छोटू भोयर हे देखील राजकारणात सक्रिय झाले. तेही महापालिकेत आधी नगरसेवक आणि काही काळ उपमहापौर म्हणून कार्यरत होते. महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून नागपूर सुधार प्रन्यासने ते दीर्घकाळ विश्वस्त म्हणूनही काम करीत होते.
मात्र तीन पिढ्या संघाशी संबंध असताना आणि दीर्घकाळ भाजपला सेवा देऊनही भोयर यांना आमदारकीची उमेदवारी मिळत नव्हती हे त्यांचे दुःख होते. दरवेळी अखेरच्या क्षणी त्यांचे नाव कापले जायचे. यावेळीही आपल्याला संधी मिळेल म्हणून ते आस लावून होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना चंद्रशेखर बावनकुळेंचे राजकीय पुनर्वसन करायचे असल्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव पुढे आले.
याच दरम्यान नाना पटोलेंनी छोटू भोयर यांच्यावर जाळे टाकले. यात सुनील केदारांचा महत्त्वाचा रोल होता. ‘तुम्ही काँग्रेसमध्ये या, तुम्हाला उमेदवारी देतो आणि निवडूनही आणतो. लागल्यास पैसाही लावू’ असे आश्वासन देऊन भोयर यांना काँग्रेसमध्ये आणले गेले. यावेळी भोयर यांनीही या मतदारसंघातील भाजपच्या असलेल्या 350 मतदारांपैकी 100 च्या वर मतदार आपले असून आपण केव्हाही त्यांना आपल्या बाजूने वळवून मत द्यायला लावू शकतो असा दावा केला होता. त्यामुळे सर्व सेटिंग लावण्यात आले. भोयरांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस अल्पमतात असली तरी आपण निवडून येऊ असा दावा पटोलेंनी पक्षश्रेष्ठींकडे केला आणि भोयर यांची उमेदवारी निश्चित झाली.
उमेदवार निश्चित झाल्यावर छोटू भोयर यांनी वाजतगाजत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर अर्जांची छाननी आणि उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटल्यावर चंद्रशेकर बावनकुळे डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर आणि मंगेश देशमुख हे अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात उरले.
इथून प्रचाराचा दौर सुरु झाला. या मतदारसंघात मते विकत घेतली जातात असे बोलले जाते. त्या दृष्टीनेच सर्वांशी सेटिंग करायचे असते. प्रचार सुरु झाला आणि काँग्रेसच्या गोटातून कुरकुर सुरु झाली. ही कुरकुर छोटू भोयर यांच्या विरोधात होती. भोयर मतदारांशी भेटत नाहीत, काँग्रेसच्या नेत्यांशीही बोलत नाही. प्रचारात फारसे उत्सुक नाहीत. अशा तक्रारी माध्यमांच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. माध्यमांमध्ये अशा आशयाच्या बातम्या आल्यावर छोटू भोयर मात्र त्याचा कायम प्रतिवाद करत होते. प्रत्येकवेळी ही भाजपची खेळी असल्याचा आरोपही ते करत होते.
त्याचवेळी काँग्रेसमध्ये असलेले सुनील केदार, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्या वेगळ्याच हालचाली सुरु होत्या. भोयर ही निवडणूक लढवण्यात आता इच्छूक नाहीत असे चित्र या सर्वच दिग्गजांकडून उभे केले जात होते. काल सकाळीच सर्व वृत्तपत्रांमध्ये भोयर यांनी आपणच निवडणूक लढवणार आणि आपण विजयी होणार असा दावा केल्याची बातमी आली होती. मात्र अचानक चित्र बदलले. दिवसभरात काँग्रेसश्रेष्ठींना निरोप गेले. विकास ठाकरे गट आणि सुनील केदार गटाने आपापल्या मतदारांच्या वेगवेगळ्या बैठकी घेतल्या. नाना पटोलेेंना साकडे घातले गेले. शेवटी संध्याकाळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांचे व्हॉट्सअॅपपवर पत्र आले. त्यात भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थतता व्यक्त केल्यामुळे सर्व मतदारांनी अपक्ष मंगेश देशमुख यांना मते द्यावीत असा आदेश या पत्रात दिला होता. मतदानाला जेमतेम 16 तास उरले असताना असे पत्र येणे ही घटनाच मुळात खळबळजनकच होती. यावेळी छोटू भोयर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी कोणतीही असमर्थतता दर्शविली नाही. असे माध्यम प्रतिनिधींना स्पष्ट केले. त्यामुळे संशयात अधिकच भर पडली. आज हा लेख लिहित असताना मतदान सुरु झालेले आहे. लेख वाचकांपर्यंत पोहोचेल तोवर मतदान आटोपलेले असेल यात निवडून कोण येणार त्याचे उत्तर निकालानंतररच मिळेल मात्र या सर्व प्रकारात कांँग्रेसजनांनी भोयर यांचा पुरता गेम केला आहे हे स्पष्ट दिसते आहे.
असे गेम करणे हे काँग्रेसकर्ता काही नवीन नाही. यापूर्वी 2007 मध्ये नागपुरातून शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते यांचाही काँग्रेसने असाच गेम केला होता. अर्थात या खेळीचे सुत्रधार तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे होते.
सुबोध मोहिते हे सरकारी नोकरीत होते. सरकारी नोकरी सोडून 1997 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लगेचच काही दिवसात ते शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख झाले. 1999 मध्ये त्यांना शिवसेनेने रामटेक लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून ते लोकसभेत विजयी झाले. मोहिते हे उच्चशिक्षित आणि ÷अभ्यासूही होते. तसेच ते महत्त्वाकांक्षी देखील होते. आपल्या अभ्यासू शैलीने त्यांनी थोड्याच दिवसाच लोकसभेवर छाप पाडली. परिणामी त्यांना 2003 मध्ये केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे पद देण्यात आले. वर्षभर ते केंद्रात मंत्री होते.
2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा मोहितेंना उमेदवारी मिळाली. यावेळीही ते चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले. मात्र त्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येऊ शकले नव्हते. त्यामुळे मोहितेंचे मंत्रीपद हुकले. मात्र वर्षभर मंत्री पद उपभोगलेल्या मोहितेंना लाल दिव्याची गाडी पुन्हा पुन्हा खुणावत होती. त्यांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
नेमकी हीच बाब तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हेरली. त्यांनी मोहित्यांना विश्वासात घेतले. तुमच्यासारखा कर्तृत्ववान कार्यकर्ता काँग्रेसमध्ये हवा, तुम्ही काँग्रेसमध्ये या, तुम्हाला पुन्हा खासदारकीची उमेदवारी देऊन निवडून आणू आणि लगेचच केंद्रात मंत्री करु असे आश्वासन त्यांनी दिले. या जाळ्यात मोहिते अडकले आणि त्यांनी तिरीमिरीत येऊन खासदारकीचा राजीनामा दिला त्याचसोबत शिवसेनेचाही राजीनामा देत त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. लगेचच पोटनिवडणूका लागल्या. त्यावेळी विलासरावांनी मोहित्यांना रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली. मोहिते निवडून येणार हे निश्चित असे चित्र निर्माण केले गेले.
मात्र त्याचवेळी काँग्रेसजनांनी वेगळी खेळी खेळली होती. त्यावेळी नागपूर जिल्ह्यात विलास मुत्तेमवार हे केंद्र सरकारमध्ये एक प्रस्थ होते. त्यावेळी मुत्तेमवार केंद्रात राज्यमंत्री होते. त्यांना नागपुरात दुसरे सत्ताकेंद्र नको होते. त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसमध्ये वजनदार असणारे रणजित देशमुख, सुनील केदार, राजेंद्र मुळक असे अनेकजण मोहित्यांच्या एंट्रीने दुखावले होते. असे बोलले जाते की या सर्व दुखावलेल्यांना विलासरावांनी अप्रत्यक्ष बळ दिले होते.
परिणामी ज्येष्ठ काँग्रेसी नेते रणजित देशमुख यांनी बंडखोरी केली. त्यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. देशमुखांनी ÷उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून मोहितेंनी विलासरावांना साकडे घातले मात्र विलासरावांनी काही फारसे केले नाही. या निवडणूकीत शिवसेनेने प्रकाश जाधव यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेची सगळी फौज कामाला भिडली होती. काँग्रेसमध्ये मात्र मोहिते एकाकी लढत होते. मुत्तेमवार, केदार, अनिल देशमुख असे सर्व दिग्गज घरी शांत बसले होते. नाही म्हणायला कोकणातून येऊन नारायण राणे मोेहितेंना मदत करत होते.
याचा परिणाम हाच झाला की दोनदा खासदार म्हूणून निवडून आलेल्या मोहितेंना या निवडणूकीत दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. याला महत्त्वाचे कारण एकच झाले रणजित देशमुखांनी घेतलेली मते सर्व काँग्रेसची होती. ही मते फुटली नसती तर मोहितेंचा विजय निश्चित होता. या प्रकारात सर्व कांग्रेसजनांनी एकत्र येत सुबोध मोहिते नामक एका धडाडीच्या नेत्याचा गेम केला. इथून मोहितेंची राजकीय वाटचाल जी थांबली ती थांबलीच. आज मोहितेंनी राजकारण सोडले आणि ते काटोलमध्ये बसून शेती करत आहेत.
याच पद्धतीने काँग्रेसने भोयर यांचा गेम केला आहे. यातून भोयर यांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक बसणार हे निश्चित झाले आहे. त्यांना आता भाजपही उभे करणार नाही आणि काँग्रेसने तर त्यांना तोंडघशी पाडले आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय करिअर आता संपले असे म्हणता येईल. याचे पूर्ण श्रेय नागपूरच्या काँग्रेसजनांना द्यावे लागेल.
मात्र यातून भोयर यांची राजकीय कारकीर्द संपवण्यापलीकडे काँग्रेसच्या हातात काहीही लागणार नाही हे निश्चित आहे. या निवडणूकीत अपक्ष मंगेश देशमुख निवडून येतीलच अशी काहीही खात्री नाही. ते निवडून आलेही तरी ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहतील का? याचे उत्तर नकारार्थीच मिळते. कारण अपक्ष म्हणून निवडणूकीचा अर्ज दाखल करताना त्याच्या अर्जावर सूचक आणि अनुबोधक म्हणून ज्या सह्या झाल्या होत्या त्या भाजप नगरसेवकांच्या होत्या. हे बघता निवडून आले तरी ते भाजपचे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते पराभूत झाले (ही शक्यता बरीच आहे) तर ही जागा आयतीच भाजपच्या पदरात पडणार आहे. यात ज्याप्रमाणे छोटू भोयर यांची अवस्था तेल ही गेले आणि तूपही गेले अशी झाली तशीच अवस्था काँग्रेसचीही झाली आहे.
हे सर्व बघता या खेळीत नाना पटोले आणि सुनील केदरांनी जो उठारेटा केला त्यातून त्यांना काहीही मिळाले नाही हे निश्चित. असे असले तरी आयुष्यभर निष्ठावंत संघ आणि भाजप कार्यकर्ता राहिलेल्या डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांचा सुबोध मोहिते केल्याचे आसूरी समाधान त्यांना मिळणार आहे असे म्हणता येईल.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

-अविनाश पाठक

Leave a Reply