हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत शंका व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

नागपूर : ९ डिसेंबर – तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवर शंका उपस्थित केली असून पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी शंकेचं निरासन केलं पाहिजे असं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून फटकारलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“काही बाबतीत राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. जिथे संरक्षण दलांचे प्रमुख यांचा विषय आहे तिथे अशी वक्तव्यं करण्यापेक्षा, देशाची सर्वोच्च प्राथमिकता अपघात का झाला ही आहे. तिन्ही सैन्यदलांची मिळून समिती तयार करण्यात आली आहे. ती समिती चौकशी करत असून त्याआधी याबद्दल बोलणं अनुचित आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ते रशियन बनावटचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर होते. बिपिन रावत यांच्यावर देशाने सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या, त्यासंदर्भात ते काम करत होते. चीन आणि पाकिस्तान संदर्भात केलेल्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. बिपिन रावत यांचा अत्यंत सुरक्षित वाहनातून जाताना अपघात होतो तेव्हा देशाच्या मनामध्ये नक्कीच शंका निर्माण होते. सरकार त्यासंदर्भात चौकशी करेलच. पण लोकांच्या मनातील शंकाचे निरासन करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांची आहे”.

Leave a Reply