नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबतच – जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

नागपूर : ९ डिसेंबर – विधान परिषदेच्या उमेदवाराबद्दल राष्ट्रवादीची भूमिका स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार सोबत असणार आहे. जो काही निर्णय महाविकास आघाडीच्यावतीने घेतला जाईल, त्यासोबत आम्ही असू अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी स्थानिक नेते काँग्रेससोबत नाराज आहे, हे मान्य करत आम्ही आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांसोबत असू, असेही स्पष्ट केले.
नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार असलेले रविंद्र उर्फ छोटू भोयर हे बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. यात विशेष म्हणजे बुधवारी नागपूरच्या एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसच्या एका गटांचे नगरसेवक उपस्थित होते. याच ठिकाणी अपक्ष असलेला मंगेश देशमुख हा उमेदवार भेटीला येतो. पण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार तिथे उपस्थित नाही. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर काँग्रेसचा उमेदवार बदलणार आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना केला असता, काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे. त्याला आमचा पाठिंबा देण्याची भूमिका असणार आहे. जे निर्णय स्थानिक नेते घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे म्हणत त्यांनी कुठेतरी स्थानिक नेत्यांवर विधानपरिषदेत निवडणुकीत कोणासोबत जायचे ही जबाबदारी सोपवली असल्याचे भाष्य केले.
हेलिकॉप्टर अपघात हा दुर्दैवी होता. यात देशातील पहिले सिडीएस असलेले बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. ही घटना देशाला हादरा बसणारी असून अत्यंत दुःखद आहे. पण या घटनेची योग्य ती चौकशी होईल आणि योग्य ती घटना बाहेर येईल, अशीच अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply