जितका आमचा आवाज दाबला जाईल, तितक्याच ताकदीने आम्ही समोर येऊ – आशिष शेलार

मुंबई : ९ डिसेंबर – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणात जामिन मिळाल्यानंतर भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात सडकून टीका केली आहे. जितका आमचा आवाज दाबला जाईल, तितक्याच ताकदीने आम्ही समोर येऊ, असेही अशिष शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी भाजप नेत्यांनी व महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन जरी मंजूर झाला असला तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आशिष शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, की माझी भूमिका स्पष्ट आहे. मी कुठल्याही व्यक्तीला महिला व महिला महापौरांना उद्देशून असे बोललो नाही. व्यवस्थेच्या विरोधातील आक्रोश अंगावर आल्यावर त्यापासून लपण्यासाठी स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याचे काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केले आहे. जी केस बनूच शकत नाही, ती बनविण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही कायदा-सुव्यवस्था मानणारे व कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. खोटा गुन्हा दाखल केला गेला. त्याचा आज मी जामीन घेतला आहे. परंतु हा एफआयआर दाखल केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची प्रतसुद्धा पोलीस स्टेशनला दिली आहे. न्यायिक व्यवस्थेतून मी सत्य बाहेर आणेन. शिवसेना व महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात संघर्ष अजून मजबूत करू, असा त्यांनी इशारा दिला.

Leave a Reply