७ लाखाची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत

यवतमाळ : ८ डिसेंबर – यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामीन देण्यासाठी त्याने तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सात लाखात तडजोड झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर शहानिशा करुन एसीबी यवतमाळने गुन्हा दाखल केला.
पोलिसानेच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यातील ५२ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल घुगल यांना अटक करण्यात आली आहे. घुगलशिवाय विद्युत वसानी आणि विशाल माकडे (रा. यवतमाळ) या खासगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या विरुद्ध यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन होण्यास मदत होईल, यासाठी आरोपींनी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार 6 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.
लाच स्वीकारताना रंगेहाथ
या तक्रारीची ६ तारखेला पंचांसमक्ष पडताळणी केली असता, आरोपींनी ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी एका मोबाईल शॉपमध्ये सापळा रचून कारवाई करताना घुगल यांनी लाचेची रक्कम विशाल माकडेच्या मार्फत स्वीकारली, तसेच विद्युत वसानी यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यावरुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

Leave a Reply