विदेशातून नागपुरातून आलेल्या तीन प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

नागपूर : ७ डिसेंबर – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढली आहे. रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाहवरून येणारे विमान ‘लॅण्ड’ झाले. विमानतळावर प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यातील सर्व प्रवाशांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. तर सोमवारी विदेशातून नागपुरात परतलेल्या माय-लेकीला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आल्याने चिंता वाढली आहे. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जणुकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने अतिजोखीम (हाय रिस्क) असलेल्या देशातून येणाऱ्या विमान प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्राप्त माहितीनुसार २९ नोव्हेंबरला यू. के. या देशातून प्रवास करून पती- पत्नी व नऊ वर्षीय मुलगी असे एक कुटुंब भारतात आले. ते विमानाने मुंबईत आले. यातील महिलेचे माहेर नागपूरचे असल्याने ती मुलीसह नागपुरात आली. तिचा पती मुंबईतच होता. मुंबईत थांबलेल्या पतीला कोरोना असल्याचे निदान झाले. तातडीने ही माहिती नागपुरात कळवली गेली. त्यावरून नागपुरातील पत्नी व मुलीचीही चाचणी केली असता त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार दोघांनाही तातडीने उपचारासाठी मिहान परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथील डॉक्टर दोघांवरही लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply