वाघाच्या भीतीने बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालये बंद

बुलढाणा : ७ डिसेंबर – बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये शनिवारी एका वाघाने संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं. त्यानंतर वनविभागाने उशीरा कारवाई करत वाघाला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं. मात्र अंधाऱ्या रात्री वाघ वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाला आहे. त्यानंतर हा वाघ शहरात आहे किंवा शहराच्या बाहेर गेला याचा थांगपत्ता लागत नाहीये. वन विभागाकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
या सर्व घडामोडीत खामगाव शहरातील ज्या भागात हा वाघ दिसला होता त्या परिसरातील काही किलोमीटर मधल्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय शाळांकडून घेण्यात आला आहे. आधीच कोरोनामुळे या शाळा बराच काळ बंद होत्या, आता पुन्हा वाघाच्या दहशतीमुळे या शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. खामगाव शहरातील ज्या भागात वाघाचा संचार आढळून आला होता त्या भागातील या शाळा-महाविद्यालय आता वाघ जेरबंद होईपर्यंत बंद असणार आहेत.
त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा शोध घेऊन खामगावकरांना वाघाच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी होताना दिसत आहे. वनविभाग वाघ पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी वाघ पकडल्याशिवाय खामगावातील शाळा सुरू होणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता परिसरातील शाळांकडून घेण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीमध्ये वाघ शिरला होता. वस्तीत वाघ शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी वाघाला पाहिले असून डरकाडी फोडत वाघ हा मार्गक्रमण करीत आहे अशी माहिती वन विभागाला देण्यात आली. अद्याप या वाघाला पकडण्यात यश आले नाहीये. पट्टेदार वाघ शहरात शिरल्याने भीतीने वातावरण आहे.
वाघ हा गेल्या काही महिन्यां अगोदर यवतमाळच्या अभयारण्यामधून दाखल झाला होता. मध्यंतरी हा वाघ बुलढाण्याच्या अभयारण्यामधून दिसेनासा झाला होता, हा तोच वाघ असेल का याबाबत वन विभाग शोध घेत आहेत.

Leave a Reply