लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी दोन डोसमधील कालमर्यादेतील अंतर कमी करा – आदित्य ठाकरे यांचे केंद्राला पत्र

नवी दिल्ली : ७ डिसेंबर – करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. मुंबईमधील लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी दोन डोसमधील कालमर्यादेतील अंतर कमी करण्याची मागणी आदित्य यांनी केलीय. आदित्य यांनी केंद्राला लिहिलेलं हे पत्र ट्विटरवरुन शेअर केलंय.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांना लिहिलेल्या पत्रामध्ये आदित्य यांनी मुंबईमध्ये लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण झाल्याचं म्हटलंय. “मुंबईमध्ये लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. तर ७३ टक्के पात्र लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत,” अशी माहितीही आदित्य यांनी दिलीय. “त्यामुळेच लसीच्या दोन डोसमधील कालावधी चार आठवड्यांचा केला तर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे लसीकरण केलं जातं तसं लसीकरण करता येईल. यामुळे जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना दोन्ही डोस देण्याचं उद्दीष्ट पूर्ण करता येईल,” असंही आदित्य पुढे म्हणाले आहेत.
दोन डोसमधील अंतर कमी केल्यास अधिक लसी लागणार नाहीत किंवा कालावधीमध्येही फार फेरफार करावा लागणार नाही, अशी आशा अदित्य यांनी व्यक्त केलीय. करोनापासून आपल्या देशाला आणि देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वरील मागण्यांसंदर्भात तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आपेक्षा आहे, असंही आदित्य पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत.
याच वर्षाच्या सुरुवातील करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या करोना योद्ध्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा डोस (बुस्टर डोस) घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही आदित्य यांनी केलीय. तर दुसरी मागणी करताना आदित्य यांनी, “मी वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत केलेल्या चर्चेनंतर असं वाटतं आहे की करोना लसीकरणाची किमान वयोमर्यादा ही १५ वर्षांपर्यंत करता येईल. असं केल्यास उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही करोना संरक्षण कवच पुरवता येऊ शकतं,” असं म्हटलंय.

Leave a Reply