भाजपकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा छोटू भोयर यांचा आरोप

नागपूर : ७ डिसेंबर – काँग्रेसचे उमेदवार यांनी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीमधून माघार घेतली असून निवडणुकीच्या मैदानातून पळ काढल्याचा प्रचार भाजप करत आहे. मतदार कन्व्हिन्स होत नसल्याने कन्फ्यूज करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधान परिषदचे उमेदवार छोटू भोयर यांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच, ही निवडणूक सार्वजनिक नसून ५६० मतदारांची असल्याने प्रचाराची पद्धतही वेगळी असल्याचे भोयर म्हणाले.
काँग्रेसचे उमेदवार यांनी दुसऱ्याला पाठिंबा दिला. त्यामुळे, काँग्रेसचा उमेदवार हा घरात बसून आहे, असा खोटा प्रचार भाजपकडून केला जात आहे. भाजपकडून बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप भोयर यांनी केला. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या संपर्कात आहे. रोज सकाळी सात वाजतापासून प्रचार सुरू असून, रात्री दोन वाजेपर्यंत प्रचाराचे काम सुरू आहे. काँग्रेसचे आमदार आणि मंत्री हे सोबत असून त्यांच्याशी बैठका असून संपर्कात आहे. महाविकास आघाडीने निवडणूक कशा पद्धतीने लढवावी हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. भाजपने निवडणूक कशी लढवावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण उमेदवार गायब झाला, पळ काढला, असा खोटा प्रचार भाजपकडून केला जात आहे, असा अरोप छोटू भोयर यांनी केला.
मतदानाला अजून तीन दिवस बाकी आहे. काँग्रेसच्या भीतीने भाजपने नगरसेवकांना कोटींचा खर्च करून पर्यटनावर पाठवले. तरीही भाजपला भीती आहे. त्यामुळे, खोटी माहिती पसरवून काँग्रेसची बदनामी करण्याचे काम ते करत असल्याचा आरोप छोटू भोयर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नाही, ते नाराज आहे, यावर बोलताना भोयर म्हणाले की, नुकतीच राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काँग्रेसची बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व नेते बैठकीत होते. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नाही, हा इतरांचा गैरसमज आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. दहा तारखेला मतदानाच्या दिवशी सगळे चित्र स्पष्ट होईल आणि भाजपला मतांचा फरक दिसेल, असेही काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यावेळी म्हणालेत.

Leave a Reply