बंदुकीतून गोळी सुटून गंभीर जखमी झालेल्या गडचिरोलीतील जवानाची प्रकृती गंभीर

नागपूर : ७ डिसेंबर – गडचिरोलीत काल सायंकाळी घडलेल्या एका घटनेतील पोलिस जवानाची तब्येत गंभीरच असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
गडचिरोलीच्या केटली कमांडो प्रशिक्षण केंद्रात सायंकाळी बंदुकीतून गोळी सुटून त्यात प्रशिष बंडोपंत चन्नावार हा ३३ वर्षांचा पोलिस जवान गंभीर जखमी झाला. गडचिरोली जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला काल रात्री उशिरा नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले. रात्रपाळीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिमा, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. हेमंत वाघमारे आणि प्लास्टिक, मायक्रोफेशियल आणि मायक्रोव्हस्क्युलर सर्जन डॉ. दर्शन रेवणवार यांनी त्याची तपासणी केली.
बंदुकीची गोळी शिरल्याने चेहरा व जबडा आतून फ्रॅक्चर झाला. तोंडाचा मजला, जिभेचा डावा अर्धा भाग, टाळूला गंभीर दुखापत झाली असल्याचे स्पष्ट झाले. रक्तस्त्राव सुरू होता तसेच चेहरा सूजलेला आहे. डोके व डाव्या डोळ्याच्या दुखापतीसह चेहर्यावर एकाधिक फ्रॅक्चर झाले. रात्रीच रॅपिड अँटीजेन चाचणी तसेच ८ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांच्या चमूसह संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा रात्रीपासून जवानाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नुरूस हसन व संचालक डॉ. अनुप मरार यांनी सांगितले.

Leave a Reply