साहित्य संमेलन म्हणजे वाद झाला पाहिजे, असा नियम झाला आहे का? – शरद पवारांनी व्यक्त केली खंत

नाशिक : ६ डिसेंबर – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नावं का दिले नाही? अस म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. आता साहित्य संमेलन म्हणजे वाद झाला पाहिजे, असा नियम झाला आहे का? अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. संमेलनाच्या समारोप प्रसंगी पवार उपस्थित होते तेव्हा ते बोलत होते.
नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी त्यांनी आपल्या काव्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह मांडला आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला कोणी नाशिककर व महाराष्ट्रातील नागरिक विरोध करू शकत नाहीत. मात्र, काही लोक त्यावर वाद निर्माण करतात याची खंत आहे. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कुसुमाग्रजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्य संमेलनाला त्यांचे नाव दिले हे स्वागतार्ह आहे. मराठी साहित्य संमेलनात त्यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी तात्यासाहेब यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे सांगत साहित्य संमेलन म्हटले की वाद निर्माण करणं ही परंपरा पडत आहे काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत. माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा माझा विश्वास आहे. साहित्य रसिकांना माझी विनंती आहे की, त्यांनी मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी नाशिकच्या गोदाकाठी हा साहित्य कुंभमेळा यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या लोकहितवादी मंडळाचे, संमेलानाध्यक्षांचे तसेच सहभागी साहित्यिक व साहित्यप्रेमींचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो असही पवार यावेळी म्हणाले आहेत.
मराठी भाषेचा विकास केवळ साहित्यिक अंगाने होऊ नये तर मराठी भाषेच्या माध्यमातून वैज्ञानिक आविष्कार घडावेत अशी त्यांची पोटतिडिक होती. त्यांनी राज्यात स्वतंत्र भाषा संचालनालय स्थापन केले. शासन व्यवहार कोश निर्माण करण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या कारकीर्दीत राज्यात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ स्थापन झाले. महाराष्ट्र शासनाने वाजवी किमतीत ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पुस्तकांची निर्मिती करण्याचे मोलाचे काम केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश निर्मितीचे शिवधनुष्य उचलले. ह्या सर्व प्रयत्नांमुळे कोश निर्मितीत महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठी भाषेचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्ये अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार मुलत: होता. भाषावार राज्य निर्मितीनंतर राज्यांतर्गत भाषेची अभिवृद्धी होणे अपेक्षित होते. परंतु, तसे म्हणावे त्या वेगाने घडत नव्हते, पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा १९२१ साली आला. मात्र, आपणास आश्चर्य वाटेल की मुंबई विद्यापीठात मराठी विभाग स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनंतर म्हणजे १९६९-७० मध्ये सुरू झाला. मराठी भाषेच्या संवर्धनात स्व. यशवंतराव चव्हाणांनी मात्र अतिशय कष्ट घेतले. ह्या प्रसंगी त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करणे औचित्याचे आहे. ते स्वतः एक उत्तम लेखक तर होतेच पण साहित्यवाचनात त्यांची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply