संपादकीय संवाद – असे बेजबाबदार अधिकारी प्रशासनात असतील तर परमेश्वरच आपला वाली असेल

कोरोनाची साथ भारततात फेब्रुवारी २०२० मध्ये आली, त्यानंतर भारत सरकारने पुढाकार घेऊन कोरोनावर लस तयार केली. ही लस प्रत्येकाने घ्यावी नव्हे त्याचे दोनही डोज घ्यावे यासाठी सर्व स्तरावर व्यापक प्रचार करण्यात आला. देशभरातील सर्व उच्चपदस्थांनी भराभर लसीचे दोनही डोज घेतले. त्यांचे फोटोही सर्वत्र झळकले. देशाने १०० कोटी लसींचे लक्ष पूर्ण केल्यावर देशभरात जल्लोषही झाला. देशातील प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन डोज घ्यावे यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, आणि नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे.
याला कारणेही तशीच आहेत, कोरोनाने संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरले होते. विशेष म्हणजे हा कोरोना संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात आले होते, श्वासातून किंवा स्पर्शातूनही हा कोरोना दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो हे सर्वांना सांगण्यात आले होते, अर्थात त्यात तथ्यही होते. त्यामुळेच प्रत्येकजण कोरोनाची व्हॅक्सिन घ्यायला उत्सुक होता, काही ठिकाणी ही लस विनामूल्य दिली जात होती तर काही ठिकाणी त्यासाठी शुल्कही घेतले जात होते, मात्र अनेक नागरिकांनी शुल्क देऊन लस टोचून घेतली.
ही लस घेणे हे जसे स्वतःसाठी सुरक्षित आहे तसेच इतरांसाठीही सुरक्षित आहे, आपण लस घेतली असेल तर आपले कोरोनापासून संरक्षण होते हे खरे त्याचबरोबर आपल्याला कोरोना झाल्यास इतरांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे व्यापक समाजहित लक्षात घेऊन सर्वांनी लस घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात होते, आणि शासकीय स्तरावर तसा आग्रह धरला जात होता, आजही तसा आग्रह शासकीय यंत्रणांकडून धरला जातो आहे.
मात्र ज्या शासकीय यंत्रणा लसीकरणासाठी जीवाचे रान कार्स आहेत, आणि सगळ्यांना आग्रह धारस्त आहेत, त्याच शासकीय यंत्रणेचा प्रभारी प्रमुख लसीकरण करून घेत नसेल आणि कधी लसीकरण करायचे हे माझ्या मनावर आहे असे उत्तर देत असेल तर जनसामान्यांना काय वाटेल, ही काही कपोलकल्पित कथा नाही तर महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्य सचिवांच्याबाबत घडलेला प्रकार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी कोविड लसीचा पहिला डोज शनिवार दि. ४ डिसेंबर रोजी टोचून घेतल्याची बातमी आहे, ज्यावेळी आपण इतका उशीर का केला हे विचारले त्यावेळी या संदर्भात निर्णय घेण्याचे मला स्वातंत्र्य असल्याचा दावा त्यांनी केला असल्याची बातमी आहे.
हे वृत्त जर खरे असेल तर एकूणच प्रकरण गंभीर मानावे लागेल. देवाशिष चक्रवर्ती हे मुख्य सचिव जरी नुकतेच झाले असले तरी त्याआधी ते मंत्रालयात अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत होते, या काळात ते दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातून येणाऱ्या अनेक लोकांना भेटत होते. यातील काही लोक छुपे कोरोनाग्रस्त असल्याची शक्यता नाकारता येत नाही, जर अश्या कोणाचा संसर्ग चक्रवर्ती साहेबांना झाला असता, तर ते काय भावात पडले असते. इथे दुसराही एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो जर चुकून माकून चक्रवर्ती साहेबांनाच कोरोनाने गाठले असते आणि ते लक्षात येण्याआधीच त्यांचा संसर्ग इतर कुणाला झाला असता तर हे प्रकरण किती धोकादायक ठरले असते, याची कल्पनाही करता येत नाही. कार्यव्यस्ततेमुळे चक्रवर्ती साहेबांना लस टोचून घ्यायला वेळ झाला नाही हे उत्तर क्षणभर क्षम्य मॅनटा येईल मात्र मला लस केव्हा टोचून घ्यायची हे ठरवून घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असा दावा करून जबाबदारी टाळणे हा प्रकार म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस मानवा लागेल. ते बेजबाबदार अधिकारी आपल्या प्रशासनात असतील तर परमेश्वरच आपला वाली आहे इतकेच म्हणता येईल.

अविनाश पाठक

Leave a Reply