३ हजार रुपयाची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक

चंद्रपूर : ४ डिसेंबर – सट्टापट्टीच्या गुन्ह्यातील आरोपीस भ्रमणध्वनी परत देण्यासाठी ३ हजार रूपयाची लाच घेणाऱ्या आवाळपूर पोलिस चौकीतील पोलिस हवालदारास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सुनील मेश्राम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर लगतच्या नांदाफाटा येथील रहिवासी तक्रारदार असून, त्याचा हॉटेल व्यवसाय आहे. तक्रारदारावर गडचांदूर पोलिस ठाण्यात जुगार खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, त्याची अटकेनंतर जामिनावर सुटका केली गेली. याप्रकरणी तक्रारदाराचा भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केला होता. जप्त भ्रमणध्वनी परत देण्यासाठी आरोपीने ५ हजार रूपयाची मागणी केली.
पण, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. सापळा रचून ३ हजार रूपयाची लाच घेताना पोलिस हवालदारास पकडल्या गेला. त्याच्याविरूद्ध गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, रमेश हाके यांनी केली.

Leave a Reply