सैन्यदलात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या घरात पहाटेच्या सुमारास दरोडा

नागपूर : ४ डिसेंबर – सैन्यदलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरात घुसून सात ते आठ बुरखाधारी दरोडेखोरांनी पहाटेच्या वेळी अधिकाऱ्याच्या वृद्ध आईचे हात बांधून त्यांच्या अंगावरील दागिने लुटून नेले. पहाटे गिट्टीखदान हद्दीत दाभा येथे घडली.
अनिता प्रभाकर मेश्राम (वय ७२) या दाभा येथील वेलकम सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा सैन्यदलात आहे. घराच्या बाजूला अनिता यांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. आईला रात्रीचे जेवण दिल्यानंतर मुलगी निघून गेली. अनिता यांनी दार लावून घेतले आणि झोपल्या. पहाटे २.३0 च्या सुमारास सात ते आठ आरोपी दाराचा कडीकोंडा तोडून आत शिरले. त्यांनी विळा, पेचकसचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. अनिता यांचे हात बांधून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील, कानातील तसेच हातातील सोन्याचे दागिने काढून घेतले. दरोडेखोरांनी अवघे घर अस्तव्यस्त करून ११ हजार रुपये रोख आणि कपाटातील सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढला. सुमारे अर्धा तास गप्प राहिल्यानंतर वृद्ध अनिता यांनी स्वत:च स्वत:ची सोडवणूक करून बाजूला राहणार्या मुलीचे घर गाठले. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर उपायुक्त विनिता साहू, ठाणेदार गजानन कल्याणकर आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी शहरातील सीमांवर नाकेबंदी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथक बोलवून घेतले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या हाती तुरी देऊन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे २९ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात चार दरोडेखोरांनी ठाकरे ले आऊट, दाभा येथे राहणाऱ्या सागर विष्णू खर्चे (३0) या वायुसेना कर्मचार्याच्या घरी दरोडा घालून तीन हजारांचे मंगळसूत्र लुटून नेले होते.

Leave a Reply