संपादकीय संवाद – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव टाळणाऱ्या संमेलन आयोजकांना रसिकांनी किती काळ सहन करायचे

नाशिक येथे सुरु असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी न झाल्याबद्दल विचारले असता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी जिथे आमच्या आदर्शांचा अपमान होतो तिथे का जायचे? असा सवाल करून आयोजकांची चक्क इज्जतच काढली आहे. साहित्य संमेलन परिसराला सावरकरांचे नाव द्यावे अशी सूचना होती, ती तर नाकारलीच पण संमेलनस्थळी किंवा संमेलनाच्या आयोजनात कुठेही सावरकरांचे नाव येऊ नये, अशी दक्षता घेतली गेली. हा सर्व प्रकार जगजाहीर झाला आहे, त्यामुळेच फडणवीसांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आजचे काँग्रेसवाले आणि डावे त्याचप्रमाणे सर्वच कथित पुरोगामी विचारवंत आणि साहित्यिक कायम दुःस्वासच करत आलेले आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळे त्यात सावरकरही होते. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या नेहरूंनी कायम नेहरू आणि गांधी परिवाराचाच उदो उदो केला, इतर सर्वांना त्यांनी अनुल्लेखाने कसे मारता येईल हीच काळजी घेतली. सावरकरांना तर महात्मा गांधींच्या खुनाच्या कटात आरोपीही बनवले गेले. त्यांच्याविरुद्ध नेहरूंनी पोसलेल्या ल्यूटियन विचारवंतांनी विविध कपोलकल्पित आक्षेपही घेतले. सावरकरांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी या सर्व आक्षेपांना अभ्यासपूर्ण उत्तरेही दिली, मात्र या वास्तवांकडे या सर्व नेहरू भक्तांनी पद्धतशीर दुर्लक्ष केले. आजही तोच प्रकार सुरु आहे.
नाशिक येथे होत असलेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आहेत. संमेलनाचा आर्थिक डोलारा भुजबळांनीच सावरला आहे. त्यामुळेच भुजबळ बोले अन संमेलन हाले अशी परिस्थिती झाली आहे. भुजबळ हे मूळचे शिवसैनिक असले, तरी त्यांचे सध्याचे गॉडफ़ादर शरद पवार हे कट्टर काँग्रेसीचं आहेत, जातीद्वेष आणि त्यातही सावरकरद्वेष त्यांच्यात शिगोशीग भरलेला आहे, त्यामुळे सावरकरांना मोठेपण दिले तर पवार दुखावणार हे ओघानेच आले. त्यामुळे नाशिकच्या साहित्यप्रेमींनी वारंवार सांगूनही भुजबळांनी सावरकरांचे नाव दूर कसे ठेवता येईल ही काळजी कटाक्षाने घेतली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सतंत्र्य लढ्यातील योगदान वादादीत आहे. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान क्षणभर बाजूला ठेवले तरी एक साहित्यिक आणि एक पत्रकार म्हणून त्यांनी केलेले कार्य हे कसे नाकारता येईल. साहित्य संमेलन परिसराला कवी कुसुमाग्रजांचे नाव दिले हे योग्यच झाले, मात्र सावरकरही त्याच तोडीचे साहित्यिक होते, हे वास्तव कसे नाकारता येईल? सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी रचलेले काव्य हे मराठी वाङ्मयात अक्षरसाहित्य म्हणून नोंदले गेलेले आहे. हा मुद्दा नाशिकचे संमेलन आयोजक आणि त्यांची मायबाप छगन भुजबळ नाकारणार काय? हा प्रश्न जनतेने त्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे.
सावरकरांचे नाव साहित्य संमेलनात कटाक्षाने टाळले त्यामुळे सावरकरांची उंची कुठेही कमी झालेली नाही, जनसामान्य आणि रसिकांच्या मनात त्यांचे असलेले स्थान अढळ राहणार आहे. मात्र सावरकरांचे नाव संमेलनातून टाळून छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली कोती मनोवृत्ती दाखवून दिलेली आहे, अश्या कोत्या मनोवृत्तीच्या नेत्यांना आणि साहित्य संमेलन आयोजकांना सामान्य जनतेने किती काळ सहन करायचे हाच खरा विचार करण्याचा मुद्दा आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply