मुलाच्या आत्महत्येनंतर मृतदेहाजवळ शोक करत बसलेल्या वडिलांचाही रेल्वेच्या धडकेत मृत्यू

भोपाळ : ४ डिसेंबर – मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृतदेहाजवळ शोक करत बसलेल्या वडिलांवरही काळाने घाला घातला. मुलाने रेल्वे ट्रॅकवर उडी घेत आयुष्य संपवलं. पोटच्या पोराचा निष्प्राण देह पाहून धक्का बसलेला ६० वर्षीय बाप तिथेच धाय मोकलून रडत होता. त्यावेळी त्यालाही रेल्वेने धडक दिली आणि पिताही गतप्राण झाला. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.
मुलाने आत्महत्या केल्यामुळे जबर मानसिक धक्का बसलेला पिता, रेल्वे रुळांवरच मुलाच्या मृतदेहाजवळच रडत बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वडिलांच्या दोघा भावांनी ट्रेन जवळ येत असल्याचं त्यांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र शोकमग्न असलेल्या पित्याला कुठलाच आवाज ऐकू न गेल्यामुळे तो तिथेच थांबला होता. अखेर ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली, अशी माहिती होशंगाबादचे पोलीस अधीक्षक गुरुकरण सिंह यांनी दिली.
मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील शोहागपूर शहरात हे कुटुंब राहत होतं. घरात जोरदार वादावादी झाल्यानंतर ३६ वर्षांचा धाकटा मुलगा तावातावाने घराबाहेर पडला. निघतानाच त्याने जीवाचं बरं-वाईट करण्याची भाषा बोलून दाखवली होती. त्यामुळे वडील आणि दोन काका त्याच्या मागोमाग घरातून निघाले होते.
घरापासून काही अंतरावरच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मुलगा गेला. धावत्या ट्रेनसमोर त्याने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी डोळ्यादेखतच मुलाच्या मृत्यूचं तांडव पाहिलं होतं. त्यामुळे तो जोरजोरात मृतदेहाजवळ रडत होता. इतक्यातच ट्रेन आली आणि तिने पित्याला उडवलं. होत्याचं नव्हतं झालं.
मयत पितापुत्र शोहागपूरमध्ये फर्निचरचं दुकान चालवत होते. तर ३८ वर्षांचा मोठा मुलगा ७० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या होशंगाबादमध्ये राहत होता. ऑटोप्सीनंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

Leave a Reply