बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधी परस्पर वळविला – वंचितची पोलिसांत तक्रार

अकोला : ४ डिसेंबर – जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून, शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधी वळविला. कडू यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून यंत्रणांचा यासाठी उपयोग केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज केला आहे.
बोगस कागदपत्र तयार केल्याची पोलीस तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असल्याची माहिती पुंडकर यांनी दिली.
अकोला जिल्हा नियोजन समितीने वार्षीक आराखडा तयार करताना मागविलेल्या प्रस्तावानुसार, १० मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रस्तावामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने काम बदल करताना जिल्हा परिषद यंंत्रणेची मान्यता घेतली नाही. परस्पर स्वतःच्या लेटर हेडवर कामांमध्ये बदल करण्यात आला. काम बदल करण्याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला नाही, असे असतानाही जिल्ह्यातील तीन रस्ते जे मुळात शासनाच्या लेखी अस्तित्वातच नाही व ज्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाकडून कोणताही क्रमांक दिला नाही, अशा रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियतव्यय मंजूर केला. या कामांचा कार्यारंभ आदेशही काढण्यात आला. जे रस्ते अस्तित्वातच नाही अशा रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश काढणे, काम जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील असताना ते इतर यंत्रणांकडून करून घेण्यासाठी वळती करणे व शासन निधीची अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

Leave a Reply