कुत्रा आडवा आल्याने विद्यार्थ्यांना सोडून देणारी कार पलटली, सुदैवाने जीवितहानी नाही

गोंदिया : ४ डिसेंबर – अर्जुन मोर येथील एका खाजगी विद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखांदूर येथे मालकीचे चारचाकी गाडीने सोडून देत असताना वाटेत कुत्रा आडवा आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला असता चारचाकी कार पलटून अपघात झाल्याची घटना घडली. सदरची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते साडे ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील साकोली – वडसा राज्य महामार्गावरील अंतरगाव येथे घडली. या अपघातात चारचाकी गाडी मधील विद्यार्थी व चालक सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली. शेषराव बोरकर (४१) रा भागडी असे चारचाकी गाडी चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील भागडी येथील काही विद्यार्थी नजीकच्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत. नियमितपणे विद्यार्थी आपल्या गावावरून लाखांदूर येथे बस व खाजगी वाहनाने येतात. विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या खाजगी शाळेचे वाहन लाखांदूर येथून संबंधित विद्यार्थ्यांना उचलून शाळेत पोहोचविते.
दरम्यान, घटनेच्या दिवशी विद्यार्थ्यांना सकाळची शाळा असल्याने व शासकीय व खाजगी वाहने बंद असल्याने एका पालकाने गावातील विद्यार्थ्यांना चारचाकी क्रमांक एम एच ३६ ए जी ४५९८ वाहनाने भागडी येथुन लाखांदूर येथे सोडुन देत होते. साकोली – वडसा राज्यमार्गावरील अंतरगाव येथे वाटेत कुञा आडवा आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला असता गाडी रस्त्याच्या कडेला पलटली. रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी पलटल्याचे पाहुन गावातील नागरीक धावले व गाडीतील विद्यार्थ्यांसह चालकाला बाहेर काढले. या अपघातात गाडीतील एक विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्याने तिच्यावर लाखांदूर येथील एका खाजगी रुग्णालयात ऊपचार करण्यात आला. अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply