काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही, त्यासाठी शरद पवार काम करत आहेत – नवाब मलिक

नागपूर : ४ डिसेंबर – ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान यूपीएसंदर्भात केलेल्या विधानाची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच, काँग्रेसला बाजूला सारून देशात विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं देखील चित्र या दौऱ्यानंतर निर्माण झालं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आज नागपूर येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आधीपासून स्पष्ट केलं आहे की देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण मोट बांधताना काँग्रेसशिवाय विरोधकांच्या एकजुटीचं काम होऊ शकत नाही. पण काँग्रेससोबतच यूपीएव्यतिरिक्त असलेल्या पक्षांनाही एकत्र आणणं गरजेचं आहे. यूपीएबाहेरच्या विरोधी पक्षाच्या खासदारांची संख्या १५० च्या आसपास आहे. त्यांनाही सोबत आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आधीपासून सगळ्यांना एकत्र करण्याविषयी शरद पवार बोलत राहिले”, असं नवाब मलिक म्हणाले.
काँग्रेससोबतच विरोधकांची एकजूट होईल, हे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. “आगामी काळात काँग्रेससोबत सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी करण्याचं काम या देशात होईल. त्याचं नेतृत्व कोण करेल, हा आत्ताचा विषय नाही. सामुहिक नेतृत्व राहायला हवं अशी चर्चा आहे. सगळे एकत्र आल्यानंतर कसं पुढे जायचं, ते तेव्हा ठरेल. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही हे आधीपासून शरद पवार सांगत आहेत. ममता बॅनर्जींचंही एकच म्हणणं आहे की सगळे विरोधक एकत्र केले पाहिजेत. त्या दिशेनं आम्ही काम करू, सगळ्यांचा मोर्चा बांधू आणि देशात एक पर्याय निर्माण करू. २०२४मध्ये निवडणुका होतील, तेव्हा देशात परिवर्तन झालेलं दिसेल”, असं ते म्हणाले.
“ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटल्या. पण त्याआधीही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हे सांगितलंय की काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही. सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. त्यासाठी शरद पवार काम करत आहेत”, असं देखील नवाब मलिक म्हणाले.

Leave a Reply