काँग्रेसला डावलून कुणालाही पुढे जाता येणार नाही – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : ४ डिसेंबर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. काँग्रेसला डावलून कुणालाही पुढे जाता येणार नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देणं आहे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.
बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधताना ममता बॅनर्जींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवतानाच आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखाची भलामण केली आहे. काँग्रेस हा जनमाणसातला राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेस हा केवळ पक्ष नाही तर विचार आहे. काँग्रेसचे विचार हे राज्यघटनेशी निगडीत आहेत. त्यामुळेच काँग्रेस शाश्वत पद्धतीने राहणार. वाईट दिवस येतील आणि जातीलही. पण तत्वज्ञान डावलले जाऊ शकत नाही. काँग्रेसला डावलणं म्हणजे विचारांना डावलणं आहे. काँग्रेसच्या विचारांना डावलणं म्हणजे फॅसिस्टवृत्तीला ताकद देणं आहे, असं सांगत थोरात यांनी सामनाच्या अग्रलेखाचं समर्थन केलं आहे.
यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावरही भाष्य केलं. विधानसभा अध्यक्षपदाचा कोणताही तिढा नाही. अध्यक्ष काँग्रेसचाच होणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावरूनही त्यांनी विखेंवर हल्ला चढवला. ते सत्तेत नाहीत. काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे त्यांना दु:ख होणं स्वाभाविक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
एसटी कर्मचाऱ्यांनो, कामावर या
एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनही संप सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य शासनाला जेवढे चांगले करता येईल तेवढे केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार कमी होते. आता बऱ्यापैकी पगारवाढ झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. जनतेला सेवा द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
विजेची थकबाकी 70 हजार कोटींची
वीज प्रश्नावरही त्यांनी सरकारची भूमिका मांडली. विजेची थकबाकी 70 हजार कोटींची आहे. वीज उत्पादनासाठी मोठा खर्च येतो. नागरिकांच्या सहकार्याशिवाय सिस्टीम चालणार नाही. शेतकऱ्यांकरिता चांगली योजना आणली आहे. तिचा शेतकऱ्यांनी तिचा उपयोग करावा. महावितरणला ताकद देण्याची गरज, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply