संपादकीय संवाद – साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक जरूर असावा मात्र तो थकलेला वयोवृद्ध नसावा

आज नाशिक येथे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु झाले आहे. साहित्य संमेलन हा साहित्यिक आणि साहित्य रसिकांचा वार्षिक कुळाचार असतो, असे या संमेलनाचे माजी अध्यक्ष कै. डॉ. द. भी. कुळकर्णी नेहमी म्हणायचे. हा कुळाचार असल्यामुळे या संमेलनाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
कुळाचार म्हटलं की, प्रथा, परंपरा आणि नियम हे ओघानेच आले. या संमेलनातही विविध प्रथा आहेत. त्यातील प्रमुख प्रथा म्हणजे या तीन दिवसीय संमेलनासाठी एक अध्यक्ष निवडला जातो, हा अध्यक्ष नंतर वर्षभर संमेलनाचा अध्यक्ष म्हणून विविध वाङ्मयीन कार्यक्रमात गौरविला जात असतो. त्यामुळे आधीच्या वर्षीचा अध्यक्ष यावर्षीच्या नव्या अध्यक्षाला सूत्रे प्रदान करीत असतो.
मात्र यावर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ठ्य असे कि अध्यक्षपदाची सूत्रे देणारे आणि सूत्रे घेणारे असे दोघेही संमेलनात उपस्थित नाहीत. बहुदा साहित्य संमेलनाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असावा. वारकरी संप्रदायाच्या विरोधामुळे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव संमेलनात येऊ न शकल्याची घटना यापूर्वी काही वर्षाआधी घडली होती, तर राष्ट्रपती संमेलनात आल्यामुळे लादलेल्या प्रोटोकॉलचा निषेध म्हणून मावळते अध्यक्ष कै. अरुण साधूंनी संमेलनावर बहिष्कार घातल्यामुळे सूत्रे देणाराच अनुपस्थित आहे असेही घडले होते. मात्र दोघेही नाहीत असे प्रथमच घडते आहे.
साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष वयोवृद्ध ख्रिस्ती विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनात येऊ शकले नाहीत, ज्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्या संमेलनातच अखेरच्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना संमेलन अर्धवट सोडून जावे लागले होते. विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर हेदेखील वृद्धापकाळामुळे आजारी आहेत परिणामी, त्यांनाही पुण्याहून नाशिकला येणे शक्य झालेले नाही. हे बघता मावळते आणि नवे दोन्ही अध्यक्ष नसण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी असे म्हणतसे येईल.
हा सर्व प्रकार बघितल्यावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करतांना त्याचे वय आणि प्रकृती यांचाही विचार व्हायला हवा, असे सुचविण्याची आज गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाला देऊन त्याचा आणि त्याच्या वाङ्मयीन योगदानाचा गौरव करण्याची परंपरा आहे. मात्र तो किती ज्येष्ठ असावा याचा विचार होणे आता आवश्यक झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा फक्त ३ दिवसांसाठी नसतो, तर पुढील वर्षभर तो मराठी वाङ्मय विश्वाचा राजदूत म्हणून ओळखला जातो. असा राजदूत हा त्यानंतर वर्षभर विविध वाङ्मयीन समारंभ आणि उपक्रमांमध्ये सहभागी होत असतो. ही बाब लक्षात घेत वर्षभर सर्वत्र उत्साहाने फिरू शकेल आणि सहभागी होऊ शकेल अशी त्या अध्यक्षाची प्रकृती असणे अपेक्षित असते. मात्र असे वयोवृद्ध साहित्यिक निवडले तर त्यांची आणि रसिकांची कितीही इच्छा असली तरी प्रकृती साथ देत नाही.
वषभर हिंडणे तर बाजूला ठेवा मात्र साहित्य संमेलनाच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये या अध्यक्षांना किमान २ दणदणीत भाषणे द्यायची असतात, ही भाषणे म्हणजे मराठी भाषेच्या वाटचालीचा आढावा घेणारे महत्वाचे दस्तावेज असतात. या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या संमेलनात दिलेल्या भाषणांच्या संकलनाची आणि त्यावरील भाष्यांची पुस्तके प्रकशित झाली आहेत. तसेच या वेगवेगळ्या भाषणांचा परामर्श घेत त्यावर अभ्यास करून अनेक अभ्यासकांनी प्रबंध सादर केले आहेत आणि विद्यापीठांनी त्यांना पीएचडीची पदवीही दिलेली आहे, यावरून या भाषणांचे महत्व लक्षात यावे. मात्र असे वयोवृद्ध अध्यक्ष निवडले आणि ते संमेलनात येऊन भाषणही देण्याच्या अवस्थेत नसले तर त्याचा उपयोग काय? असा मुद्दा उपस्थित होतो.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत भविष्यात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतांना तो ज्येष्ठ साहित्यिक जरूर असावा मात्र अगदीच वयोवृद्ध नसावा याची काळजी घेणे गरजेचे होणार आहे. साहित्य विश्वात कार्यरत असलेल्या प्रत्येक साहित्यिकाला आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे अशी मनोमन इच्छा असते, मात्र अध्यक्ष झाल्यावरच तुमच्या साहित्याची कदर होते असे नाही, मराठीत अजरामर साहित्य निर्माण करणारे अनेक साहित्यिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, म्हणून रसिकांच्या मनातील त्यांच्या स्थानाला कुठेही धक्का लागलेला नाही. त्यांचे वाङ्मयीन योगदान निर्विवाद राहिलेले आहे. त्यामुळे भविष्यात संमेलनाध्यक्ष निवडतांना तो ज्येष्ठ जरूर असावा मात्र वयोवृद्ध आणि थकलेला नसावा याची काळजी घ्यायलाच हवी इतकेच आज सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply