नागपुरात विदर्भवाद्यांनी केले केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नागपूर : ३ नोव्हेंबर – स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव केंद्र सरकार पुढे आलेला नसल्याचं उत्तर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिल्यानंतर विदर्भवादी कमालीचे आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारचे मंत्री खोटं बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. आपला निषेध नोंदवण्यासाठी विदर्भवाद्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य केव्हा होईल या संदर्भात लोकसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याच्या अनुषंगाने कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. एकाप्रकारे केंद्राने हा विषयच फेटाळून लावलेला असल्यामुळे विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारचे मंत्री चुकीची माहिती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. आमच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीला जाऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा देखील विदर्भवाद्यांनी केली आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या नावावर राजकारण करूनच भारतीय जनता पक्षाने २०१४ साली सत्ता संपादित केली होती. मात्र, त्या पाच वर्षांच्या काळात भाजपाने सोयीस्करपणे विदर्भाकडे दुर्लक्ष केल्याने २०१९ च्या निवडणुकीत भाजपला विदर्भातील जनतेने अद्दल घडवली. ज्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले होते. आता पुन्हा भाजपने विदर्भाचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आहे. ते भाजपाला महागात पडेल, असा दावा अरुण केदार यांनी केला आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती संदर्भात कोणताही प्रस्ताव केंद्र सरकार पुढे आलेला नसल्याचं उत्तर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्ट केल्यानंतर विदर्भवादी नेते आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नित्यानंद राय यांचा दावा खोटा असल्याचं म्हंटल आहे. यापूर्वी नाना पटोले, विजय दर्डा यांनी देखील स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला असल्याचं सांगितलं आहे.

Leave a Reply