चोरी करायला आले आणि गावकऱ्यांच्या तावडीत सापडले

नागपूर : ३ डिसेंबर – ही घटना आहे भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातली. वेळ आज पहाटे दोनची… चोरट्यांनी आपला मोर्चा पिंपळगाव कोहळीचे उपसरपंच गोपाल पाटील परशुरामकर यांच्या घराकडं वळवला. मागील दरवाजा तोडताना आवाज झाल्यानं गोपाल परशुरामकर यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी वेळीच उठून पाहिले असता चार अनोळखी लोक दिसले. चोर दरवाज्याची छेडछाड करताना दिसले. महिलेनं पतीला आवाज दिला. गोपाल यांनी घराच्या मागे जाऊन बघीतले. लक्षात येताच चोर घरामागून पळू लागले.
गोपाल यांनी दिनेश परशुरामकर व देवाजी परशुरामकर यांना सोबत घेतले. चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. चोर पुढं पुढं गावकरी मागे असा चोर-पोलिसाचा खेळ सुरू झाला. मात्र, त्यातील एक चोर ठेच लागून जमिनीवर पडला. त्याची गावकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली. इतर तिघे सुटकले. त्यानंतर चोराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चोराच्या डोळ्याला मार लागल्यानं त्याला लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या चोरट्यांनी सर्वप्रथम ईश्वर मडकाम यांच्या घरातून आठ सोन्याचे मनी चोरले. त्यानंतर खेमराज गहाणे यांच्या घरात घरफोडीच्या उद्देशाने घुसले. मात्र, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नंतर त्यांनी गोवर्धन गहाणे यांच्या घरी प्रवेश केला. ते जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांनी साहित्याची नासधूस केली. बेडरूममधील आलमारीमधून अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच २० हजार रुपये रोख रक्कम या चोरट्यांनी लांबविली. गोवर्धन गहाणे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना ही चोरी करण्यात आली आहे. चोराला पकडल्याची वार्ता साऱ्या गावात पोहचली. गावकरी एकत्र आले. पोलीस आता इतर तिघांच्या शोधात लागले आहेत.

Leave a Reply