भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवरील ऐतिहासिक लहान पूल कायमस्वरूपी येणार पाण्याखाली

भंडारा : २ डिसेंबर – हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करून उभा असलेल्या महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा निर्णय प्रकल्प विभागाने घेतला आहे. त्यानुसार हळूहळू पाण्याची पातळी वाढविण्यात येत आहे. पाण्याची अंतिम पातळी गाठल्यानंतर भंडाराजवळच्या वैनगंगा नदीवरील ऐतिहासिक लहान पूल कायमस्वरुपी पाण्याखाली येणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची सोय व्हावी, यासाठी ब्रिटिशांनी देशभर रस्ते आणि पुलाचे जाळे विणले. त्यातून त्यांनी आपले साम्राज्य विस्तारले. नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारानजीक वैनगंगा नदीवरील पूल याच हेतूने उभारला गेला. तत्कालीन सीपी अँण्ड बेरार प्रांताचे गर्व्हनर सर मॉन्टेग्यू बटलर यांनी या पुलाची मुहुर्तमेढ रोवली. या पुलाला आता ९२वर्षांचा काळ लोटत आहे. २0 जुलै १९२९ ला पुलाचे उद््घाटन झाले. या पुलावरून प्रवास करण्यासाठी ब्रिटिशांनी जकात कर लावला होता. पुलावरून सायकलने जरी जायचे झाल्यास जकात कर द्यावा लागत होता. हा कर स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे कायम होता. नंतर तो रद्द करण्यात आला. या पुलाला आता ९२ वर्षे पूर्ण होत आली तरी हा पूल ताठ मानेने उभा आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या पुलावरून सुरक्षेच्या दृष्टिने जड वाहतूक बंद करण्यात आली होती. दुचाकी व पायी वाहतूक तेवढी सुरू होती. परंतु, वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन हा पूल पाण्याखाली येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिने पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. पुलाची शंभरी पूर्ण होण्याआधीच हा ऐतिहासीक वारसा कायमस्वरुपी पाण्यात गडप होणार आहे.

Leave a Reply