चंद्रपूर जिल्ह्यात आढळले १५ ते २० हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म

चंद्रपूर : २ डिसेंबर – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात तब्बल ४ फुट लांब आणि १ फुट रुंद असे पायाचे हाड, ३ फुट लांब बरगडीचे हाड आढळले आले आहे. त्यांचा आकार बघता ते डायनोसोर या विशालकाय प्राण्याचे दिसते. परंतु, तेथील भूस्तर लक्षात घेता १५ ते २० हजार वर्षापूर्वीच्या दुर्मिळ हत्तीचेही ते असू शकते, असा दावा चंद्रपूर येथील भुशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुळाना गावाजवळून नदी वाहते. हिमयुगीन काळात महापुरात वाहत आलेला दगड-गाळाचा थर या नदीच्या पात्रात काही ठिकाणी आढळतो. त्याच ठिकाणी ६ कोटी वर्षाच्या कालखंडातील बेसाल्ट खडकाचे थरही आहेत. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण होते. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडक आढळला. चोपणे यांनी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी त्या ठिकाणी भेट दिली असता, ती हाडे हे जिवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावे, असा असा दावा त्यांनी केला आहे.
यातील मोठे जीवाश्म हे ४ फुट लांब मांडीचे हाड आहे. जवळच छातीच्या बरगडीचे ३ फुट लांब हाड आढळले आहे. हाडाच्या आकारावरून हा प्राणी १५ फुट उंच आणि आणि २० फुट लांब असावा. त्यामुळे तो जीव एकतर डायनोसोर किंवा विशाल आकाराचा हत्ती असला पाहिजे, असे चोपणे म्हणाले. इथे गेल्या काही वर्षापासून रेती उत्खननाचे काम सुरु असल्याने काही हाडे पाण्यात फेकली असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. हे जिवाश्म अगदी नाजूक आणि कच्चे असल्यामुळे ते काही १५-२० हजार वर्षादरम्यानाचे असावे, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. आकारावरून ते विशालकाय डायनोसोरचे वाटते. परंतु, ज्या गाळात ते आढळले आणि जितके ते नाजूक आहे त्यावरून आणि अलीकडे याच नदीत सापडलेले हत्तीच्या दातांचे पुरावे यावरून ते हत्तीचे असावे, असाही अंदाज चोपणे यांनी व्यक्त केला आहे. प्रयोगशाळेतील तपासणी नंतरच ते जिवाश्म नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे आणि काळ कोणता आहे, ते कळेल.

Leave a Reply