घ्या समजून राजे हो… भाजप विरोधकांचे ऐक्य करण्यासाठी अहंकार सोडण्याची प्रक्रिया नाना पटोलेंनी आपल्या पक्षापासूनच सुरु करावी

सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्त्यांवरुन देशातील सर्वात जुना असलेला आणि आजच्या स्थितीत सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यांच्या वक्तव्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रभृतींनी तीव्र शब्दात टीकाही केलेली आहे.
या टीकेचा परामर्श घेताना नेमके ममता बॅनर्जींचे आणि शरद पवारांचे वक्तव्य काय याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते. काल पवारांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वात ज्या पुरोगामी लोकशाही आघाडीच्या बॅनरखाली देशातील भाजपविरोधी पक्षांनी निवडणूका लढवून १० वर्ष सत्ता उपभोगली होती ती संयुक्त पुरोगामी आघाडी सध्या अस्तित्वात आहेच कुठे? असा प्रश्न विचारून कांँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याचवेळी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. सतत परदेशात राहून स्थानिकांच्या समस्या सोडवता येतील का असे विचारताना रस्त्यावर येऊन संघर्ष गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ काँग्रेसचे नेते रस्त्यावर येत नाही असाही काढला जातो आहे. शरद पवारांनीही नेतृत्वाचा मुद्दा न आणता भाजप विरोधकांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादित केली आहे. याचा अर्थ पवारांनी ममतांचे नेतृत्व मानले असा घेणे धाडसाचे ठरेल. कारण पवार बोलतात त्याच्या विपरीत वागतात असे त्यांच्या संदर्भात कायम बोलले जाते.
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या या विविध वक्त्यांवमुळे काँग्रेसचे नेते संताप न होते तरच नवल. कांँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी एकजुटीने भाजपला उत्तर देण्याची गरज असल्याचे मानत मात्र ममतांच्या अहंकाराने नाही तर सामंजस्याने एकजूट करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा विरोधी ऐक्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही केली. कांँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत गेली 7 वर्षे भाजपच्या विरोधात राहूलजींच्या नेतृत्वात काँग्रेस नीडरपणे रस्त्यावर येऊन लढाई लढली असल्याचा दावा केला आहे. भाजप सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांच्यासारख्या घटनात्मक संघटनांच्या मदतीने विरोधकांना दाबत असल्याचा आरोप करीत भाजपच्या या दमशाहीविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज नाना पटोले यांनी प्रतिपादित केली आहे.
काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्यावर टीका झाल्यामुळे नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना संताप येणे अत्यंत सहाजिक आहे आणि हा संताप व्यक्त करणे हे या नेत्यांना आपल्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. या मुद्याचाच परामर्श घेण्याचा या लेखात आज प्रयत्न करण्यात येणार आहे.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन अहंकार बाजूला ठेवत लढण्याची गरज असल्याचे नाना पटोले सांगतात. नाना पटोले यांच्या या म्हणण्याला कोणीही नाकारणार नाही. मात्र अहंकार कुणी सोडायचा हा मुद्दा सर्वप्रथम पुढे येणार आहे. 1996 साली काँग्रेसला बाजूला सारण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज होती त्यावेळी तत्कालिन भाजपने पुढाकार घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे गठन केले होते. मात्र त्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वमान्य ठरेल असे नेतृत्व भाजपजवळ होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाला व्यक्तिगत स्तरावर कोणाचाही विरोध नव्हता. त्यामुळेच देशातील अनेक काँग्रेसविरोधी पक्ष भाजपच्या नेतृत्वात एकत्र आले आणि काँग्रेसला सक्षम पर्याय देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. तब्बल 6 वर्ष त्यांनी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले. त्याला उत्तर म्हणूनच मग 2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे गठन झाले आणि काँग्रेसच्या नेतृत्वात संपुआचे सरकार सत्तेत आले. मात्र पुढच्या 10 वर्षात विरोधात असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागरुक विरोधकांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली होती. यावेळी प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपचे लोकसभेत दरवेळी 100 च्यावर सदस्य राहत होते.
आज विरोधकांचे ऐक्य झाले तर त्याचे नेतृत्व काँग्रेसकडेच असले पाहिजे असा काँग्रेसचा दावा राहील. त्याला कारणेही दिली जातील. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असून देशात दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिली आहे असेही सांगितले जाईल. काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी ज्या गांधी-नेहरु परिवाराला दैवत मानले आहे त्या गांधी-नेहरु परिवारातील वारसांनाच संपुआचे नेतृत्व देण्यात यावे असा आग्रह देखील धरला जाईल.
मात्र देशातील इतर भाजपविरोधकांना हे मान्य होईल काय हा खरा कळीचा मुद्दा आहे. ज्याप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व देशातील सर्वपक्षांना आणि जनसामान्यांनाही मान्य होते त्याप्रमाणे सोनिया गांधी किंवा राहूल गांधी आणि अगदी गेलाबाजार प्रियंका गांधी यांचे नेतृत्व देशातील विरोधीपक्ष विनातक्रार मान्य करतील काय याचा विचार पटोले आणि चव्हाण आणि थोरातांनी करायला हवा. सोनिया गांधी या विदेशी रक्ताच्या असल्याचा मुद्दा विरोधकांनी कायम मांडला असून देशातील जनसामान्यांचेही ते मत असल्याचे अनेक जनमत चाचण्यातून जाणवले असल्याची माहिती आहे. त्याशिवाय राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनियांकडे पक्षाची सूत्रे आली त्यावेळी त्यांनी देशवासियांना आकर्षित करेल असे कोणतेही कर्तृत्व दाखवलेले नाही. त्यांच्या पाठोपाठ मैदानात आलेल्या राहूल गांधी यांना विरोधकांनी कायम पप्पू म्हणून हिणवले आहे. विरोधी नेत्याला अशाप्रकारे हिणवणे हे राजकारणात चालतेच. मात्र आपल्या कर्तृत्वाने ते खोडून काढता येते. पण राहूल गांधी यांना अजूनतरी ते साधलेले नाही. ज्या कांँग्रेसने देशाला सहा दशकांहून अधिककाळ नेतृत्व दिले त्या काँग्रेसला 2014 मध्ये विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यात इतपतही जागा मिळवणे कठीण झाले होते. त्यावेळी देशात सोनिया, राहूल या माय-लेकरांचीच सत्ता होती. हे बघता विरोधकांची आघाडी झाली आणि त्याचे नेतृत्व काँग्रेसकडे आले तर देशातील मतदार काँग्रेस नेतृत्वाला स्विकारेल काय याचा विचारही पटोले थोरात-चव्हाण आणि इतर सर्व काँग्रेसजनांनी करणे गरजेचे आहे.
आता प्रश्न येतो तो भाजपला संपवण्यासाठी विरोधकांची जी सक्षम आघाडी उभारायची त्या आघाडीत प्रसंगी कमीपणा घेऊन विरोधकांना ताकद देण्यासाठी काँग्रेस पुढे येईल काय? नाही म्हणायला पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने हा प्रयोग नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केला होता. मात्र राष्ट्रीय स्तरावर हा प्रयोग करायला काँग्रेस तयार होईल काय? पश्चिम बंगालची स्थिती वेगळी होती. राष्ट्रीय स्तरावर अशी माघार घ्यायला गांधी-नेहरु घराणेच आज तयार होईल असे वाटत नाही.
काँग्रेसने प्रसंगी माघार घेतली तरी विरोधकांचे ऐक्य होऊन झालेल्या आघाडीतून देशाचे नेतृत्व कोणी करावे हा वाद पुढे येणार आहे. कारण विरोधकांमध्ये ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरे असे अनेक दिग्गज पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. हे सर्व एकत्र येऊन सरकार बनवतील काय आणि बनवले तर हे किती काळ टिकेल हे प्रश्न आज अनुत्तीत आहे. नाना पटोले म्हणतात तसा सर्वांचा अहंकार बाजूला ठेवावा लागेल मात्र नानांसकट कोणीही अहंकार बाजूला ठेवणार नाही. हे आज तरी स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे आज हे ऐक्य म्हणजे स्वप्नरंजन आहे. भाजपला सत्तेतून बाजूला सारण्यासाठी विरोधकांचे ऐक्य करायचे असेल तर सर्वात आधी नाना पटोले यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना कमीपणा घ्यायला तयार करावे लागेल ते करण्याचा प्रयत्न नानांनी केला तर त्यांना प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागेल आणि पुन्हा भाजपमध्ये घेता का म्हणून मंथनही करावे लागेल. हे नक्की आहे.
देशातील भाजप सरकार घटनात्मक संघटनांचा वापर करुन विरोधकांना छळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. असे आरोप मोदींचे सरकार आल्यापासून मोदीविरोधक कायमच करत असतात. मात्र जनसामान्य या आरोपांवर विश्वास ठेवतील काय हे बघणे महत्त्वाचे आहे. भाजपने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला, भाजपने देशात छुपी आणिबाणी आणण्याचा प्रयत्न केला, भाजपने ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा घटनात्मक संघटनांचा दुरुपयोग करुन विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला असे आरोप विरोधकांनी 2019च्या निवडणूकीतही अगदी पूर्ण ताकदीनीशी केले होते. मात्र 2014 मध्ये मतदारांनी ज्या भाजपला 282 जागांवर विजयी केले होते त्या भाजपला 2019 मध्ये 303 जागा देत त्यांच्या कार्यशैलीला एकप्रकारची पावतीच दिली होती. अर्थात यावेळी इव्हीएम मशीन हॅक झाल्याचा आरोप करण्यात आला. पण तो सिद्ध करता आला नाही.
या पार्श्वभूमीवर मला 1975 ते 1977 या कालखंडाकडे लक्ष वेधायचे आहे. त्या काळात तत्कालिन काँग्रेसी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जे काही अतिरेकी वर्तन केले होते त्याने देशातील विरोधी पक्षच नाही तर जनसामान्य दुखावला होता. देशातील पोलिसांपासून सर्व घटनात्मक संघटनांचा त्यावेळी काँग्रेसने जास्तीत जास्त दुरुपयोग केला होता. आज मोदी सरकार घटनात्मक संघटनांचा दुरुपयोग करते असा कंठशोष विरोधकांना मोकळ्या मनाने करता येतो. मात्र 1975 ते 1977 देशात माध्यमांचीही तोंडे बंद केली गेली होती. कुठेही काहीही बोलता किंवा लिहिता येत नव्हते. तरीही काँग्रेसच्या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी 1977 साली सर्वसामान्य माणूस मतपेटीच्या माध्यमातून खुलेआम व्यक्त झाला आणि त्याने काँग्रेसला आपली जागा दाखवून दिली.
आज मोदी सरकार अतिरेक करीत असल्याचा आरोप फक्त मोदी विरोधक करत आहेत. जनसामान्यांपर्यंत हा आरोप पोहोचवण्यात किंवा प्रसंगी त्यांच्या गळी उतरवण्यात विरोधकांना यश आलेले नाही. अर्थात मोदी अन्याय करतात असे सांगून जनसामान्य त्यावर विश्वास ठेवतील असे मानणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात फिरणे आहे. 1975 ते 1977 जरी माध्यमांची तोंडे बंद होती तरी इंदिरा सरकराच्या दडपशाहीचा फटका जनसामान्यांना बसला होता. अक्षरशः प्रत्येक गल्लीतला किमान एक माणूस विनाकारण तुरुंगात डांबला गेला होता. अनेकांवर कारण नसतांना बळजबरीने नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. संपूर्ण देशाच कारागृह बनला होता. त्यामुळे जनसामान्य संतापला होता आणि हा संताप मतपेटीतून बाहेर पडला होता.
आज भाजपला सत्तेतून दूर करण्याचा कथित संकल्प करताना नाना पटोले यांनी या सर्व मुद्दांचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे. आजच्या काँग्रेस पक्षाची अवस्था घरातल्या दीर्घकाळ कुटुंबावर अधिकार गाजवणाऱ्या एखाद्या ज्येष्ठ वृद्धासारखी झालेली आहे. आता आपण थकलो आहोत, आता कुणी आपले फारसे ऐकणार नाही याची जाणीव न ठेवता मी अजूनही करताच आहे अशा भावनेतून कुटुंबात ढवळाढवळ करणाऱ्या व्यक्तीला जसे अपमानाला सामोरे जावे लागते तसेच आज काँग्रेस पक्षाचे होते आहे. मात्र काँग्रेसजनांना त्याची जाणीव होत नाही किंवा जाणीव असली तरी ते मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण होत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून दूर सारण्याच्या आणि त्यासाठी विरोधकांचे ऐक्य प्रस्तावित करणाऱ्या नाना पटोले यांच्या विचारांचे स्वागतच आहे. त्यांनी अहंकार सोडून विरोधकांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. नानांनी विरोधी ऐक्यासाठी अहंकार सोडण्याची प्रक्रिया आपल्या पक्षापासून सुरु करावी आणि मग इतरांना अहंकार सोडण्याचे आवाहन करावे इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply