कोरोना लस न घेणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांचे पगार रोखले

नागपूर : २ डिसेंबर – कोरोना प्रतिबंधक लस घ्या, असं वारंवार सांगूनही काही कर्मचारी काही ऐकेनात. शेवटी लस न घेणाऱ्या ११ जणांचे पगार रोखण्यात आले. त्यामुळं आता लस घेण्याची हमी त्यांनी दिली.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ३०४ कर्मचारी आहेत. यातील ११ जणांनी एकही लस घेतली नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. वारंवार सांगूनही काही कर्मचारी लस घेत नव्हते. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी लस न घेणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचे पगार रोखले. त्यानंतर कुठे या कर्मचाऱ्यांना जाग आली. आपल्याला वेगवेगळे आजार असल्यानं लस घेतली नाही, असं स्पष्टीकरण सात कर्मचाऱ्यांनी दिलेत. त्यांना वैद्यकीय कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आलंय. तर चार कर्मचाऱ्यांनी पगार रोखल्यानंतर लस घेण्याची हमी दिली. तेव्हा कुठे आता त्यांचे पगार होण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंटचा प्रकार समोर आला आहे. याची धास्ती साऱ्यांनीच घेतली. शासन-प्रशासनाने कामाला लागले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत आहेत. संजय गांधी निराधार योजनेतही काही कामचोर कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. योग्य माहितीच त्यांनी पुरविली नाही. त्यामुळं त्यांचे पगारही रोखण्यात आल्याचं कळते. शेवटी कारवाईचा बडगा उभारताच कर्मचारी कामाला लागले.

Leave a Reply