काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा ममतादीदींचा प्रयत्न आणि पवार साहेबांची त्याला साथ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २ डिसेंबर – शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी मुंबईत काँग्रेसबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेसकडून याला तीव्र आक्षेप घेतला जात असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून शरद पवार आणि शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
“एक तर सगळ्यांनी मान्य केलं आहे की २०२४ देखील मोदींचंच असणार आहे. म्हणून त्यांना हरवण्यासाठी काय रणनीती करता येईल, यावर खलबतं चालली आहेत. असे प्रयोग २०१९मध्येही झाले, पण त्यांना यश आलं नाही. लोकांनी मोदींवरच विश्वास ठेवला. २०२४सालीही लोकं पुन्हा मोदींवरच विश्वास ठेवतील. पण यातून एक मात्र लक्षात येतंय, की आता काँग्रेसला बाजूला ठेवून बिगर काँग्रेस विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत आणि पवार साहेबांची त्याला साथ आहे. त्यावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे की आमच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा अंतर्गत सामना सुरू आहे. त्यांचा सामना झाला की आमच्याशी कसं लढायचं ते ठरवतील”, असं फडणवीस म्हणाले.
“शरद पवार अंडरलाईन स्टेटमेंट करतायत की काँग्रेस सोडून नवी आघाडी करायची. ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत आणि पवार साहेब बिटविन द लाईन बोलणारे आहेत. दोघांचं बोलणं एकच आहे. दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे आणि इतर विरोधी पक्षांना एकत्र आणायचं आहे. ममतादीदी नॉर्थइस्ट आणि गोव्यात का लढत आहेत? कारण प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेस नसून आम्ही आहोत हे त्यांना दाखवायचं आहे. त्या सगळ्याला पवार साहेबांचं समर्थन आहे. त्यांचं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं आहे. मात्र, राज्यातली परिस्थिती त्यांना अनुकूल नाहीये. त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणून ते काँग्रेसला सोबत घेत आहेत”, असं देखील फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजपावर टीका करणाऱ्या शिवसेनेवर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. “त्यांचे किती निवडून आले आहेत? ५६ निवडून आले आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट ४०-४२ टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा ७० टक्के होता. त्यामुळे कुणाला राज्यातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल. संजय राऊत, शिवसेनेने कितीही लांगुलचालन केलं, तरी त्यांना फायदा होणार नाही. पण एक चांगलंय. आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं, हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply