हे सरकार पालथ्या पायाचे, म्हणूनच राज्य अडचणीत – विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात

नाशिक : १ डिसेंबर – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “कोरोनाचं संकट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल असे अनेक संकट या सरकारच्या काळात आले. हे सरकार पालथ्या पायाचं सरकार आहे. त्यामुळे राज्य अडचणीत आलं आहे”, असा घणाघात विनायक मेटे यांनी केला.
“सरकार आणि विमा कंपन्यांचं साटंलोटं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाहीत. राज्य सरकार ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वीज तोडत आहे. सभागृहात एक बोलायचं आणि प्रत्यक्षात वेगळं वागायचं, असा विश्वासघात सरकार करत आलं आहे. विश्वासघात हा ठाकरे सरकारचा स्थायीभाव आहे. प्रत्येक घटकांचा या सरकारने विश्वासघात केला. या सरकारला शिवाजी महाराज स्मारकासाठी २ वर्षात २ मिनिटंदेखील यासाठी वेळ देता आलेला नाही. मंत्री अशोक चव्हाण तोंड बंद करुन बसले”, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनावर सुरु असलेल्या वादांवरही विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली. “साहित्य संमेलनाचा इतिहास खूप मोठा आहे. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रेक्षकांमध्ये बसले होते. राजकारण होऊ नये म्हणून अलीकडच्या काळात साहित्य संमेलनात राजकारण वाढलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ स्वागत अध्यक्ष झाल्याने असं होणारच होतं. पालकमंत्री पावभाजी खायला थोडी केले आहेत”, असं विनायक मेटे म्हणाले.
भाजपची सत्ता असलेल्यांनी पैसे दिले ते चालतं, मग नाव का चालत नाही? कोणत्याही सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचं नाव असतं. त्यावर कुणाचा आक्षेप नाही. आक्षेप असण्याचं कारणही नाही. मात्र इतर नेत्यांचे नाव घ्यायचे नाही. हे राजकारण करणं योग्य नाही. साहित्य संमेलनाला बडेजावचे स्वरुप दिले जात आहे. हा पैसा नव्या साहित्याकांच्या कामासाठी दिला तर त्याचा फायदा होईल”, असं विनायक मेटे म्हणाले.
“स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमीतले आहेत. मग त्यांचं नाव घेताना तुम्हाला लाज का वाटते? तुम्ही त्यांचे गुणगाण गाता, त्यांच्यावर पुस्तकं लिहिता. भाषण ठोकता, व्याख्यानं देतात. सगळं करतात. मग त्यांचं नाव घेताना तुम्हाला नको वाटतं. का? ते आपल्या देशाचे अभिमान आहेत. महापुरुषांचा आदरच केला पाहिजे”, असंदेखील विनायक मेटे यावेळी म्हणाले.

Leave a Reply