मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार हे चुकीचे – राज्यमंत्री बच्चू कडू

सांगली : ३० नोव्हेंबर – एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास ९० हजारपैकी ७३ हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या एकाच मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. सांगलीच्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार पगार मिळतो. पण जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त १२ हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर फक्त ८ तास वीज मिळत असेल आणि पूर्ण बिलाची वसूली केली जात असेल तर ते चुकीचं आहे. सरकार नक्की त्यावर विचार करेल, असंही बच्चू कडू म्हणाले.
जगभरात कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी राज्य सरकारनेही कोरोना नियम पाळण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच निर्बंध लादण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही मिळतेय. त्यावर बोलताना कोरोनाची भीती एवढी झाली की सो जा बेटे गब्बर आयेगा असं म्हणण्याऐवजी आता सो जा बेटे कोरोना आ जायेगा, असं म्हणण्याची वेळ आल्याची मिश्किल टिप्पणीही बच्चू कडू यांनी केलीय. त्यामुळे सरकारला कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

Leave a Reply