परमवीर सिंह आणि सचिन वाझेंची १ तास बंदद्वार चर्चा

मुंबई : २९ नोव्हेंबर – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर हजर होताना सचिन वाझेसोबत तब्बल तासभराचा संवाद झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका खोलीत या दोघांची भेट झाली आहे. या दोघांमध्ये काय बोलणे झाले हे गुलदस्त्यात असलं तरी देखील या भेटीबाबत अनिल देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, काँग्रेसनेही यावर आक्षेप नोंदवला असून यात काही कट आहे का, अशी शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे.
परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून आता मुंबई पोलीस या भेटीची चौकशी करणार आहेत. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भेट कोणी घडवली?, त्यांच्या भेटीसाठी अधिकृत परवानगी होती का? याची चौकशी आता मुंबई पोलीस करणार आहेत. याबरोबरच यासंदर्भात सचिन वाझेला चांदीवाल आयोगासमोर ज्या पथकाने हजर केले, त्या पथकाचीही चौकशी करण्यात येणार आहे.
चांदिवाल आयोगासमोर जाण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भेट होण्यावर काँग्रेस पक्षानेही तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दोन आरोपी, दोन कैदी किंवा चौकशीला पुढे जाणाऱ्या दोन व्यक्ती या एकमेकांना भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग, असे असताना ते का भेटले, कशासाठी भेटले, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली?, या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना या पूर्वी कधीही घडलेली नाही. आपल्या पदाचा वापर करून आपल्या सोबत कोणकोणते राजकरणी आहेत आणि त्यांच्या दबावातून जर या गोष्टी घडत असतील, तर हे महाराष्ट्रासाठी गंभीर आहे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.
या भेटीमुळे चौकशीला बाधा पोहोचू शकते अशी परिस्थितीही निर्माण झालेली आहे. जर असे झाले असेल, तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. या भेटीमागे कोण आहे आणि त्यात काय कट शिजला याचीही चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply