समुद्रातील माशांना देवी लक्ष्मीच्या बहिणी मानले पाहिजे – केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला

नवी दिल्ली : २८ नोव्हेंबर – समुद्रातील माशांना देवी लक्ष्मीच्या बहिणी मानलं पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलं आहे. गुजरातमध्ये आयोजित आत्मनिर्भर ग्राम यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. गावांमध्ये तसंच ग्रामीण भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी राज्य सरकारकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरुषोत्तम रुपाला यांनी यावेळी लोकांनी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं सांगत त्यांना आवाहन केलं.
“मत्स्य क्षेत्राबद्दल लोकांना फार कमी माहिती असून त्यात कोणी जास्त रसही घेत नाही. पण समुद्र लक्ष्मीचे पितृस्थान आहे याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. देवी लक्ष्मी समुद्राची मुलगी आहे. मी हे सांगत आहे कारण ज्याप्रकारे देवी लक्ष्मी समुद्राची मुलगी आहे त्याचप्रमाणे मासादेखील समुद्राची मुलगी आहे. याअर्थाने मासा देवी लक्ष्मीची बहीण आहे. यामुळे जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्हाला तिच्या बहिणीचाही आशीर्वाद घ्यावा लागेल,” असं पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी देवाने एकदा माशाचं रुप घेतलं होतं असंही नमूद केलं.
पुरुषोत्तम रुपाला यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किसान क्रे़डिट कार्डमधून मिळणारा लाभ वाढवला असल्याची माहिती दिली. किसान क्रेडिट कार्डमध्ये मच्छिमारी आणि पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याज दिलं जातं.

Leave a Reply